
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर त्यांनी काही दिवसांपूर्वीच भारताला टॅरिफचा महाराजा म्हटले होते. सातत्याने ते भारतावर टीका करताना दिसत आहेत. अमेरिकेचे अधिकारी व्यापार चर्चा करण्यासाठी दिल्लीत येत असतानाच नवारो यांनी भारताबद्दल पुन्हा आग ओकली. मात्र, यादरम्यान त्यांनी एक मोठी गोष्ट देखील मान्य केली. डोनाल्ड ट्रम्प हेच ही व्यापार चर्चा व्हावी, याकरिता आग्रही होते. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर भाष्यही केले. मात्र, त्यांच्या वरिष्ठ सल्लागाराची भूमिका अजूनही भारताबद्दलची बदलली नसल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे. त्यांनी पुन्हा भारताला टार्गेट केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
पीटर नवारो यांनी म्हटले की, भारताची व्यापार धोरणे अमेरिकन कामगारांसाठी अत्यंत हानिकारक ठरत आहेत.त्याचा परिणाम अमेरिकेत होतो. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. ज्यामध्ये भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला. हेच नाही तर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफवर भारतानेही सडेतोड उत्तर देत हा चुकीचा व्यवहार असल्याचे म्हटले. अजूनही टॅरिफवरून तणाव सुरू असतानाच भारताचे व्यापार धोरण अमेरिकन कामगारांसाठी धोकादायक असल्याचे थेट नवारो यांनी म्हटले.
सीएनबीसी इंटरनॅशनलला एक मुलाखत पीटर नवारो यांनी दिली. या मुलाखतीतात भारताबद्दल बोलताना त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, युक्रेनवरील हल्ल्यापासून भारतीय रिफायनर्सचे रशियन रिफायनर्सशी संबंध आहेत. ते आमच्यासोबत व्यापार करत मोठा पैसा कमावतात. यामुळे थेट आमच्या अमेरिकन कामगारांचे नुकसान होते. भारत आमच्याकडून केलेल्या व्यापाराच्या पैशातूनच रशियाकडून तेल खरेदी करतो.
रशियन भारताकडून खरेदी केलेल्या तेलाच्या पैशांनी शस्त्रे खरेदी करतात. मुळात म्हणजे विषय असा आहे की, गेल्या काही वर्षांपासून भारताला सर्वाधिक धोका हा चीनकडूनच आहे. त्यामुळे पुतिन आणि नरेंद्र मोदी यांना चीनच्या व्यासपीठावर पाहणे फक्त मनोरंजक होते. मला अजिबातच वाटत नाही की नरेंद्र मोदी यांना त्या व्यासपीठावर सुरक्षित वाटले असेल. नवारो हे नेहमीच भारताबद्दल भडकावू विधाने करताना दिसतात. ही पहिली वेळ नाही की, त्यांनी भारताबद्दल असे काही विधान केले. अमेरिकेत महागाई भारतावरील टॅरिफनंतर गगणाला पोहोचली आहे.