अमेरिकेत पुन्हा ‘ट्रम्प’ पर्व; डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा घेतली राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ

डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी युनायटेड स्टेट्स कॅपिटल रोटुंडा येथे पार पडला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक उद्योगपती आणि मोठे नेते उपस्थित होते.

अमेरिकेत पुन्हा ट्रम्प पर्व; डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा घेतली राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
Donald Trump US President
| Updated on: Jan 20, 2025 | 11:21 PM

Donald Trump Swearing-in Ceremony : डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता आणि भारतीय वेळेनुसार आज रात्री 10.30 वाजता शपथविधी सोहळा पार पडला. यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत ट्रम्प पर्व सुरु झाले आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रं दिली. डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी युनायटेड स्टेट्स कॅपिटल रोटुंडा येथे पार पडला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक उद्योगपती आणि मोठे नेते उपस्थित होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेण्यापूर्वी जेडी वन्स यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेण्यासाठी मंचावर उभे राहिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. सध्या अमेरिकेत कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी अमेरिकेच्या संसदेत पार पडला. अनेक दशकांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळा अमेरिकेच्या संसदेत पार पडला.

फक्त 35 शब्दात घेतली शपथ

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती शपथ घेताना फक्त 35 शब्दात शपथ घेतली. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या शपथेमध्ये केवळ 35 शब्द असतात. “मी शपथ घेतो की मी युनायटेड स्टेट्सच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार निष्ठापूर्वक करीन आणि माझ्या क्षमतेनुसार, संविधानाचे जतन, संरक्षण आणि रक्षण करीन.” असे ते यावेळी म्हणाले.

शपथविधी सोहळ्याला 700 पाहुणे

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला 700 पाहुणे उपस्थित होते. भारतातून उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हजेरी लावली. याशिवाय इलॉन मस्क, जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग आणि टिम कुक, सॅम ऑल्टमन आणि टिकटॉकचे प्रमुख शौ जी च्यु हे देखील यावेळी सहभागी झाले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. “माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली याबद्दल खूप अभिनंदन. आपल्या दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगाचे चांगले भविष्य घडविण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहे. तुम्हाला पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा.” असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.