
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वांना मोठा धक्का देत म्हटले की, माझ्या आवडतीचा शब्द आता टॅरिफ असून हा शब्द मला खूप जास्त आवडत आहे. याचे कारण म्हणजे आपण लवकर श्रीमंत होऊ शकतो. आपल्याकडे जितका पैसा यापूर्वी कधीच आला नव्हता, तेवढा पैसा येतोय. काही लोक अमेरिकेचा फायदा करून घेत होते आणि बदल्यामध्ये काही देत नव्हते. आता त्यांच्यावर योग्य नियम लावलाय. अमेरिकेने भारतावर अत्यंत मोठा टॅरिफ लावला. हा टॅरिफ लावण्याकरिता त्यांनी कारण दिले की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण टॅरिफ लावत आहोत. मात्र, भारतापेक्षाही जास्त तेल चीन हा रशियाकडून खरेदी करतो. मात्र, त्या चीनवर कोणताही टॅरिफ अमेरिकेने लावला नाही.
मागील काही दिवसांपासून टॅरिफच्या मुद्द्यामध्ये चीन-अमेरिका यांच्यातील संबंध तणावात आहेत. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा डाव टाकत थेट म्हटले की, चार आठवड्यांत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत ते भेट घेणार आहेत. अमेरिका-चीन व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार असल्याचे स्पष्ट आहे. या बैठकीचा सर्वात मोठा चर्चेचा विषय असणार ते म्हणजे सोयाबीन. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये चीन सोयाबीन खरेदी करत नसलेल्या नुकसानाचा उल्लेख केलाय.
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन हा अमेरिकेचे सोयाबीन खरेदी करत नसल्याचा आरोप केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आपल्या देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे .चीन व्यापार आणि शुल्कावर सौदा करण्यासाठी आपल्याकडून सोयाबीन खरेदी करत नाही. मागील काही दिवसांपासून चीनने अमेरिकेचे सोयाबीन खरेदी बंद केली. याचा मोठा फटका त्यांना बसताना दिसतोय.
चीनने अमेरिकेची सोयाबीन खरेदी बंद केल्याने त्याचा मोठा फटका हा तेथील शेतकऱ्यांना बसलाय. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी असेही म्हटले की, या शुल्कातून मिळणाऱ्या महसुलाचा काही भाग शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही देणार आहोत. चीनने सोयाबीन खरेदी बंद केल्याने आता थेट डोनाल्ड ट्रम्प हेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत.