
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी भारताविरोधात 50 टक्के टॅरिफ लावला आहे. तसेच त्यांनी एचवनबी व्हिसाच्या शुल्कवाढीचाही निर्णय घेतला आहे. एचवनबी व्हिसा मिळवण्यासाठीच्या शुल्कात वाढ केल्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका भारतीयांनाच बसला आहे. दरम्यान, अमेरिकेतही ट्रम्प यांच्या काही निर्णयांमुळे आश्चर्य व्यक्त केले जाते. ट्रम्प धक्कातंत्र वापरून असे काही निर्णय घेतात, ज्यामुळ अमेरिकेतील जनता अचंबित होऊन जाते. याच कारणामुळे तेथील जना अमेरिकी सरकारच्या काही धोरणांचा उघडपणे विरोध करताना दिसते. दरम्यान, सध्या डोनाल्ड ट्रम्प एका आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी अमेरिकेतील गर्भवती महिलांना एक अजब सल्ला दिला आहे. या सल्ल्यामुळे आता ट्रम्प यांच्यावर टीका केली जात आहे. विशेष म्हणजे वैज्ञानिक आणि औषधनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांनीदेखील ट्रम्प यांच्या या सल्ल्याशी असहमती दर्शवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी गर्भवती महिलांना एक सल्ला दिला आहे. या सल्ल्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी गर्भवती महिलांनी अॅसेटामिनोफेन (टायलेनॉल किंवा पॅरासिटेमॉल) या औषधाचा मर्यादित वापर केला पाहिजे. या औषधाचा सातत्याने वापर केल्यास होणाऱ्या बाळाला ऑटिजमचा धोका होऊ शकतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ऑटिजम हा आजार असणाऱ्या मुलांच्या व्यवहारामध्ये बदल जाणवतो. हा आजार झालेली मुले अन्य लोकांशी जास्त संपर्क ठेवत नाहीत. विशेष म्हणजे ऑटिजम याला स्पष्टपणे आजारदेखील म्हणता येत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेचे आरोग्य सचिव रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांच्या नेतृत्त्वात काही महिने एक अभ्यास करण्यात आला. याच अभ्यासाचा आधार घेत महिला पॅरासिटेमॉल या गोळीचा जास्त वापर करत असतील तर मुलांना ऑटिजम होऊ शकतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिकांनी मात्र या दाव्याचे खंडन केले आहे.
गर्भधारणेमध्ये ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशी छोटी-मोठी समस्या जाणवू लागल्यास डॉक्टर पॅरासिटेमॉल ही गोळी घेण्याचा सल्ला देतात. दुसरीकडे ट्रम्प मात्र पॅरासिटेमॉल किंवा टाईलेनॉल हे औषध घेणे योग्य नाही, असे सांगत आहेत. साधारण ताप, अंगदुखी असेल तर हे औषध घेणे टाळावे. फारच त्रास होत असेल तर हे औषध घ्यायला हवे, असेही त्यांनी सुचवले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील लसीकरणाच्या वेळेमध्येही बदल करण्याचे संकेत दिले आहेत. प्रत्येक मुलाला हेपेटायटिस-बीची लस का दिली जाते, हे न समजण्यासारखे आहे. जेव्हा मुल 12 वर्षांचे होईल, तेव्हा ही लस द्यायला हवी, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. बाळांना दिल्या जाणाऱ्या लसींमध्ये असणाऱ्या घटकांमुळेही ऑटिजम हा आजार होऊ शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेचा मात्र काही लोक विरोध करत आहेत. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.