Donald Trump : H-1B व्हिसाची फी 88 लाख कोणी केली? डोनाल्ड ट्रम्प नव्हे तर…खऱ्या मास्टरमाईंडचे नाव समोर!
डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसा मिळण्यासाठी लागणाऱ्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागचा मास्टरमाईंड कोण हे आता समोर आले आहे. याच व्यक्तीच्या सांगण्यावरून ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

H-1B Visa Decision : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपासून भारताविरोधात अनेक निर्णय घेतलेले आहेत. यातलाच सर्वाधिक धक्कादायक असा 50 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय आहे. या निर्णयानंतर आता ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसा मिळवण्यासाठीच्या शुल्कामध्ये प्रचंड वाढ केली आहे. आता हा व्हिसा हवा असेल तर तब्बल 88 लाख रुपये मोजावे लागतील. दरम्यान, आता ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला असला तरी या निर्णयामागच्या खऱ्या मास्टरमाईंडचे नाव आता समोर आले आहे.
हे आहेत त्या निर्णयामागचे मास्टरमाईंड
डोनाल्ड ट्रम्प यांचे औद्योगिक सहकारी तसेच त्यांच्या जवळचे मानले जाणारे पीटर नवारो हेच या निर्णयमागचे मास्टरमाईंड असल्याचे बोलले जात आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाचे खासदार अमी बेरा यांनीच तशी शंका व्यक्त केली आहे. या सर्व निर्णयप्रक्रियेमागे नवारो हे असू शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नवारो भारताविरोधात गरळ ओकताना दिसत आहेत. त्यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफचे थेट समर्थन केलेले आहे. असे असतानाच एच-1बी व्हिसाच्या शुल्कवाढीमागेही तेच असल्याचे आता समोर आले आहे.
एच-1बी व्हिजाच्या शुल्कवाढीवर मी सहमत नाही
इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी दैनिकाने अमेरिकेचे खासदार अमी बेरा यांची मुलाखत घेतली. याच मुलाखतीत त्यांनी पीटर नवारो यांचे नाव घेतले आहे. अमेरिकन सरकारच्या या निर्णयामागे ट्रम्प यांचे सहकारी पीटर नवारो हे असावेत असं वाटतं. सध्या एच-1बी व्हिजाच्या शुल्कवाढीवर मी सहमत नाही. ही शुल्कवाढ लागू करण्याची एक पद्धत आहे. असे निर्णय घेण्याआधी अगोदर सूचना किंवा इशारा दिला जातो. यामागे पीटर नवारो यांचेच विचार आहेत, असे मला वाटते,” असे मत अमी बेरा यांनी व्यक्त केले.
माझं भारताला एकच सांगणं आहे की…
पुढे बोलताना त्यांनी नवारो यांनी भारताविरोधी बोलणे योग्य नाही, असेही मत व्यक्त केले. नवारो यांच्याकडून केली जाणारी वक्तव्ये ही भारत-अमेरिकेच्या संबंधांसाठी फायदेशीर ठरेल, असं मला वाटत नाही. मी तर नवारो यांची फारशी दखल घेऊ नका असेच भारताला सांगेन. अमेरिकन सरकारमध्ये असलेल्या एका बड्या अधिकाऱ्याने अशा प्रकारची विधान करू नयेत, असे अमी बेरा म्हणाले आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प भारताला लक्ष्य करताना पाहायला मिळतायत. टॅरिफवाढीनंतर आता व्हिसा शुल्कवाढ करण्यात आली आहे. एच-1बी व्हिसावर अमेरिकेत जाणारे सर्वाधिक कर्मचारी हे भारतातीलच आहेत. ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका भारतालाच बसणार आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
