Donald Trump : डोनाल्ड्र ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, अमेरिकेत कट्टर शत्रूसोबत…नेमकं काय घडतंय?
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या भेटीत शाहबाज शरीफ वेगवेगळे मुद्दे उपस्थित करणार असून भारताचे शरीफ यांच्या अमेरिका दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

Shehbaz Sharif And Donald Trump Meeting : भारताचे पाकिस्तानसोतबचे संबंध समस्त जगाला माहिती आहेत. पहलगाम हल्ला आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तानचे संबंध जास्तच तणावाचे झाले आहेत. दुसरीकडे रशियाला कोंडीत पकडण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताला वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला होता. अजूनही हा टॅरिफ मागे घेण्यात आलेला नाही. असे असताना आता एच-1बी व्हिसावरील शुल्क 88 लाख रुपये करून नोकरीसाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांपुढे एक मोठा अडथळा निर्माण करण्यात आलेला आहे. असे असतानाच आता अमेरिका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? याकडे भारतासह समस्त जगाचे लक्ष लागले आहे.
शाहबाज करणार ट्रम्प यांच्याशी चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानेच पंतप्रधान शाहबाज शरीफ न्यूयॉर्कच्या दौऱ्यावर जाणार आहेत. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या वार्षिक सत्रात ते सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत इतरही मुस्लीम राष्ट्रांचे प्रतिनिधी असतील. या दौऱ्यादरम्यान शाहबाज शरीफ तसेच मुस्लीम राष्ट्रांचे प्रमुख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने 21 सप्टेंबर रोजी ही घोषणा केली आहे.
शाहबाज यांचा चार दिवस अमेरिकेत मुक्काम
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार शरीफ न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80 व्या वर्षिक सभेत भाग घेतील. ते 22 ते 26 सप्टेंबर या काळात अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील. शरीफ यांच्या प्रतिनिधी मंडळात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार अन्य मंत्री आणि अधिकारी असतील.
कोणकोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?
मिळालेल्या माहितीनुसार शाहबाज शरीफ ट्रम्प यांना भेटल्यानंतर प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय शांती, सुरक्षेशी संबंधित मुद्द्यावर ट्रम्प यांच्याशी चर्चा करतील. या बैठकीला इतरही इस्लामिक देशांचे प्रतिनिधी असतील. गेल्या बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढण्याचाही ते यावेळी प्रयत्न करणार आहेत.
बैठकीकडे भारताचे असेल लक्ष
मिळालेल्या माहितीनुसार इस्रायल-हमास यांच्या युद्धात गाझा पट्टीत नागरिकांची होत असलेली आबाळ थांबवण्यासाठी काही निर्णायक आणि ठोस कारवाई करण्याचेही शरीफ आवाहन करणार आहेत. दरम्यान, आता शाहबाज शरीफ आणि ट्रम्प यांच्यात बैठक होणार असल्याने या बैठकीत भारत, जम्मू-काश्मीरशी संबंधित मुद्दा उपस्थित केला जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
