
अमेरिकन प्रशासनात सध्या सर्वकाही आलबेल नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. रविवारी जेरोम पॉवेल यांनी एक निवेदन जारी करत आपल्याविरुद्ध फौजदारी चौकशी सुरू झाली असल्याची माहिती दिली आहे. यानंतर त्यांनी म्हटले की, ‘अशा धमक्या म्हणजे व्याजदर निर्णयांबाबत अमेरिकन सेंट्रल बँकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे पण मी शेवटपर्यंत हार मानणार नाही.’ याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बिझनेस टुडेने दिलेल्या बातमीनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वाढत्या संघर्षादरम्यान फेडरल अभियोक्त्यांनी फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्याविरुद्ध फौजदारी चौकशी सुरू केली आहे. याबाबत पॉवेल म्हणाले की, ‘गेल्या शुक्रवारी न्याय विभागाने फेडरल रिझर्व्हला ग्रँड ज्युरी समन्स जारी केला आहे. यात जून 2025 मध्ये सिनेट बँकिंग समितीसमोर दिलेल्या साक्षीशी संबंधित फौजदारी आरोपांची धमकी देण्यात आली आहे.’ यामुळे जेरोम पॉवेल यांच्याविरुद्ध एक नवीन कायदेशीर कारवाई सुरु झाली आहे. मात्र पॉवेल यांनी म्हटले की, ‘ही कारवाई व्यापक राजकीय संदर्भात पाहिली पाहिजे. कोणीही कायद्याच्या वर नाही.’
जेरोम पॉवेल यांनी पुढे म्हटले की, ‘हे संपूर्ण प्रकरण काँग्रेसची दिशाभूल करणे किंवा देखरेख टाळणे याबद्दल नाही. ही धमकी गेल्या जूनमध्ये साक्षीशी किंवा फेडरल रिझर्व्ह इमारतींच्या नूतनीकरणाशी संबंधितही नाही. ही धमकी थेट चलनविषयक धोरण निर्णयांशी जोडली पाहिजे. फौजदारी आरोपांची धमकी ही फेडरल रिझर्व्हने राष्ट्रपतींच्या प्राधान्यांचे पालन करण्याऐवजी सार्वजनिक हितासाठी व्याजदर निश्चित केल्यामुळे देण्यात आली आहे.’
ट्रम्प प्रशासनाच्या चौकशीवर बोलताना पॉवेल म्हणाले की, ‘मी कोणत्याही प्रकारच्या दबावापुढे झुकणार नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम राहीन. सार्वजनिक सेवेसाठी कधीकधी धमक्यांना तोंड देऊन खंबीर राहावे लागते. मी अमेरिकन लोकांची सेवा करण्यासाठी सिनेटने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडत राहील.’ पॉवेल यांच्या या विधानामुळे ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.