
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मी बोलेन तो कायदा अशा पद्धतीने वागत आहे. पाठचा पुढचा कसलाही विचार न करता टॅरिफ लादत सुटले आहे. भारतावरही अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. दुसरीकडे, भारताने रशियासोबतचे संबंध कायम ठेवले असून तेल आयात करणार या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे भारत अमेरिका संबंध टोकाचे ताणले गेले आहेत. अशा घडामोडी घडत असताना डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सुरक्षा सल्लागार आणि आता कट्टर विरोधी असलेल्या जॉन बोल्टन यांनी त्यांच्यावर टीका केली. भारतावर लादलेल्या टॅरिफचा त्यांनी विरोध केला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेला निर्णय चुकीचा आणि विचित्र असल्याची टीका त्यांनी केली. या टीकेनंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरावर एफबीआयने छापेमारी केली आहे. सूत्रांनी एपीला दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय कागदपत्रांच्या हाताळणीच्या चौकशीसंदर्भात हे छापे टाकले होते. त्यांना ताब्यात घेतलं नाही. त्यांच्यावर सध्या कोणताही आरोप नाही.
जॉन बोल्टन यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यानंतर प्रशासनाकडून अधिकृत अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण एफबीआयचे संचालक काश पटेल यांचं एक ट्वीट मात्र चर्चेत आहे. ‘कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही. मिशनवर असलेले एफबीआय एजंट’, असं ट्वीट त्यांनी छापेमारीनंतर लगेच केलं होतं. दुसरीकडे, छापेमारी सुरु असताना बोल्टन यांनी ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्काराच्या महत्त्वकांक्षेवरही टीकास्त्र सोडलं. रशिया आणि युक्रेन युद्धात त्यांच्या हस्तक्षेपानंतर काहीही होणार नाही.
जॉन बोल्टन म्हणाले की, ‘ट्रम्प यांच्या भेटीनंतर रशियाच्या धोरणात काही एक बदल झालेला नाही.’ तर ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्यासाठी जोर बैठका सुरु आहेत. पण या चर्चेत फार काही होणार नाही, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. अशिया खंडातील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी मागील सरकारांना भारताशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. पण ट्रम्पच्या अशा धोरणांमुळे भारताचे चीन आणि रशियासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील, असं देखील बोल्टन यांनी सांगितलं होतं.