G-7 च्या इशाऱ्याने खामेनेईचा खात्मा, इस्त्रायलच्या समर्थनासाठी संपूर्ण पश्चिम, कॅनडामधून दिला थेट संदेश
Israel-Iran War: इस्त्रायलच्या सुरक्षेसाठी आम्ही पूर्णपणे त्यांच्या सोबत आहोत. कोणत्याही परिस्थिती इराणला अण्वस्त्र बनवण्याची परवानगी देण्यात येणार नाही, असे जी ७ राष्ट्रांनी म्हटले आहे.

इराण आणि इस्त्रायल यांच्यात भीषण संघर्ष सुरु आहे. त्यावेळी जगातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था असणाऱ्या जी ७ राष्ट्रांची शिखर परिषद कॅनडामध्ये सुरु आहे. या शिखर परिषदेतून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकर परतणार आहे. त्यांनी इराणला अणूबॉम्ब बनवू देणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. त्याचवेळी जी ७ मधील देशांनी एक संयुक्त निवेदन दिले आहे. इराण-इस्त्रायल युद्धासंदर्भात वक्तव्य या निवेदनातून केले आहे. त्या वक्तव्यानंतर इराण-इस्त्रायल या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
जागतिक दबावाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि उपाय शोधण्यासाठी G7 देशांचे नेते कॅनडामध्ये जमले होते. तथापि, इराणच्या अणुकार्यक्रमावरील संघर्षामुळे हा कार्यक्रम पूर्णपणे विस्कळीत झाला. इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेला संघर्ष आता अधिक धोकादायक आणि अनियंत्रित होत चालला आहे. दोन्ही देश चार दिवसांपासून एकमेकांवर बॉम्बहल्ला करत आहेत.
कॅनडामधील जी ७ बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व राष्ट्रांनी संयुक्त निवेदन काढले आहे. या निवेदनातून इस्त्रायलचे ठामपणे समर्थन करण्यात आले आहे. तसेच इराणला दहशतवादाचा गड म्हटले आहे. मिडिल इस्टमध्ये शांतता आणि स्थैर्य ठेवण्यावरही या निवेदनात भर दिला आहे.
निवेदनात काय म्हटले?
जी ७ मधील नेत्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, इस्त्रायलच्या सुरक्षेसाठी आम्ही पूर्णपणे त्यांच्या सोबत आहोत. कोणत्याही परिस्थिती इराणला अण्वस्त्र बनवण्याची परवानगी देण्यात येणार नाही. इराणकडे अण्वस्त्र असू नये. कारण इराण दहशतवाद आणि प्रादेशिक अशांतता निर्माण करत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी ७ शिखर परिषद सोडून लवकर परतणार आहे. त्यांनी इराण-इस्त्रायल संघर्षाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच सर्व पश्चिमी देश एका सुरात इस्त्रायलचे समर्थन करत आहे. जी ७ राष्ट्रांनी इस्त्रायलसोबत येणे म्हणजे इस्त्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांचे समर्थन आहे. यामुळे इस्त्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना ताकद मिळणार आहे. जगात इराण एकटा पडला आहे. पाकिस्तानकडूनही इराणला समर्थन मिळत नाही. तसेच इराण अजूनही शस्त्रसंधीसाठी पुढाकार घेत नाही. एकंदरीत जी ७ कडून इराणचे सुप्रीम लिडर अयातुल्लाह अली खामेनेई यांचा खात्मा करण्याची तयारी दिसत आहे.
