भारतासाठी अत्यंत मोठी खुशखबर, होर्मुझनंतर इराणचा आणखी मोठा निर्णय, आता एअरस्पेस…

Iran Air Space : तब्बल 50 दिवसांनंतर इराणने आपले हवाई क्षेत्र अंशतः खुले केले आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील विमानांना आता या मार्गाने प्रवास करता येणार आहे.

भारतासाठी अत्यंत मोठी खुशखबर, होर्मुझनंतर इराणचा आणखी मोठा निर्णय, आता एअरस्पेस...
Iran Air
Image Credit source: Google
| Updated on: Apr 18, 2026 | 5:27 PM

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध सध्या थांबलेले आहे, दोन्ही देशांमध्ये दुसऱ्या टप्प्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. युद्धाच्या काळात इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. त्यामुळे इराणच्या हवाई क्षेत्रातून जाण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक विमानाला परवानगी नव्हती. मात्र आता तब्बल 50 दिवसांनंतर इराणने आपले हवाई क्षेत्र अंशतः खुले केले आहे. इराणच्या सिव्हिल एव्हिएशन प्राधिकरणाने सांगितले की, आता इराणच्या पूर्व भागातून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. यामुळे भारतासह जगभरातील एअरलाईन्सला मोठा दिलासा मिळाला आहे.

इराणमध्ये लवकरच हवाई सेवा सुरू होणार

इराणमधील काही विमानतळे सकाळी 7 वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहेत. असं असलं तरी फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट्सवर आंतरराष्ट्रीय विमानांनी इराणच्या वरून प्रवास केल्याचे दिसत नाही. अनेक एअरलाईन्स अजूनही सुरक्षेच्या कारणास्तव इराणच्या हवाई क्षेत्राला टाळून लांब मार्गाने प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. हवाई क्षेत्र सुरू केल्यानंतर इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, हळूहळू देशभरातील विमानतळांवर उड्डाणे सुरू केली जातील.

इराणकडून होर्मुझ पुन्हा बंद

इराणने काल होर्मुझ खुला करण्याची घोषणा केली होती, मात्र त्यानंतर काही तासांनी इराणने स्पष्ट केले की, होर्मुज सामुद्रधुनी सध्या पूर्णपणे खुली नाही. हा मार्ग सध्या फक्त शस्त्रसंधीच्या काळात आणि काही अटींसहच खुला आहे. पुढे बोलताना इराणी अधिकाऱ्यांनी म्हटले की, लष्करी जहाजे आणि शत्रूशी संबंधित जहाजांना येथून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच, जर लेबनॉनमधील इराण समर्थित हिज्बुल्लाह संघटनेवर दबाव वाढवला, तर निर्णय पुन्हा बदलू शकतो.

50 दिवसांपासून इंटरनेट बंद

इराणने विमानसेवा सुरू केली असली तरी इंटरनेट अजूनही बंद आहे. इंटरनेट मॉनिटरिंग संस्था NetBlocks च्या मते, देशात डिजिटल ब्लॅकआउटला 50 दिवस पूर्ण झाले आहेत. म्हणजेच जवळपास सात आठवड्यांपासून लोक जागतिक इंटरनेटपासून दूर आहेत. याचा लोकांच्या कामकाजावर, संपर्कावर आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे आता आगामी काळात इराणकडून इंटरनेट सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Follow Us