त्याला कॅन्सर होता, तिला किडनी हवी होती… दोघांनी या अटीवर केलं लग्न; पुढे काय झालं?

Unique Love Story : आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या जोडप्याची लव्हस्टोरी सांगणार आहोत. चीनमध्ये कॅन्सर असणाऱ्या एका तरुणाने किडनीचा त्रास असणाऱ्या महिलेसोबत लग्नाचा करार केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

त्याला कॅन्सर होता, तिला किडनी हवी होती... दोघांनी या अटीवर केलं लग्न; पुढे काय झालं?
Unique Love Story
| Updated on: Oct 28, 2025 | 10:05 PM

तुम्ही आतापर्यंत अनेक प्रेमकथा वाचल्या आणि पाहिल्या असतील, मात्र आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या जोडप्याची लव्हस्टोरी सांगणार आहोत. चीनमध्ये कॅन्सर असणाऱ्या एका तरुणाने किडनीचा त्रास असणाऱ्या महिलेसोबत लग्नाचा करार केला आहे. दोघांनी अटी मान्य केल्यानंतर लग्न झाले आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. या लग्नाची आणि लव्हस्टोरीची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. या अनोख्या कथेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टने एक वृत्त दिले आहे. यानुसार, किडनीची समस्या असलेल्या एका महिलेने कॅन्सर असणाऱ्या एका तरुणासोबत लग्न केले आहे. या लग्नाआधी एक अट दोघांनी मान्य केली होती. कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर तरुणी त्याची किडनी तरुणीला दान करेल आणि किडनीची समस्या असलेली महिला त्याच्या मृत्यूपर्यंत त्याची काळजी घेत राहील अशी ही अट आहे, जी दोघांनी मान्य केली आहे. लग्नानंतर या दोघांमध्ये एकमकांविषयी आदर आणि प्रेम निर्माण झाले.

चीनच्या शांक्सी प्रांतात ही कथा सुरु झाली. 24 वर्षीय वांग जिओला युरेमियाचे निदान झाले. तिला किडनी प्रत्यारोपण करण्याची गरज होती, असे न केल्यास तिच्याकडे जगण्यासाठी फक्त एक वर्ष शिल्लक होते. नातेवाईकांमध्ये किडनी न मिळाल्याने वांगने एका कर्करोग मदत गटात लग्नासाठी जाहिरात दिली. तिला कर्करोग असणाऱ्या पुरूषांची गरज होती, जो तिला किडनी देऊ शकेल. काही दिवसांनंतर 27 वर्षीय यु जियानपिंगने तिच्या जाहिरातीला उत्तर दिले. या दोघांचा रक्तगट जुळत होता.

अटी मान्य झाल्यानंतर जुलै 2013 मध्ये लग्न केले. हे लग्न गुपित ठेवण्यात आले.युच्या मृत्यूनंतर तो त्याची एक किडनी वांगला दान करेल आणि वांगने त्याच्या उपचारादरम्यान त्याची काळजी घेईल अशी ही अट होती. त्यानंतर हे दोघे प्रेमात पडले. दोघे दररोज बोलू लागले. वांगने त्याच्यासाठी सूप बनवायला सुरुवात केली. नंतर यूच्या उपचारासाठी वांगने रस्त्यावर स्टॉल लावत फुलांचे गुच्छ विकायला सुरुवात केली. तिने युच्या शस्त्रक्रियेसाठी 70 हजार डॉलर जमा केले. त्यानंतर यूची प्रकृती सुधारली. डॉक्टरांनी सांगितले की, आता त्याला शस्त्रक्रियेची गरज नाही.

दोघेही बरे झाल्यानंतर दोघांनी रेस्टॉरंटमध्ये लग्नाचा समारंभ आयोजित केला. कालांतराने त्यांच्या कहाणीवर ‘व्हिवा ला विडा’ हा चित्रपट बनवण्यात आला. 2024 मध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला. या चित्रपटाने 276 दशलक्ष युआनची कमाई केली. सध्या हे जोडपे शियान येथे फुलांचे दुकान चालवत आनंदाने जीवन जगत आहे.