जगाला हादरवणारा दिवस… पवित्र मक्कावर हल्ल्याचा प्रयत्न, सौदीचा दावा; हुती बंडखोरांचा खुलासा काय?
मक्का पवित्र स्थळावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा सौदी अरेबियाचा दावा आणि हुती बंडखोरांनी केलेला इन्कार यामुळे जगात संभ्रम निर्माण झाला आहे. सौदीने ड्रोन पाडल्याचे सांगितले, तर हुतींनी पवित्र ठिकाणांना लक्ष्य केल्याचा आरोप फेटाळला. या घटनेने मध्य पूर्वेतील सौदी-यमन संघर्षाची तीव्रता अधोरेखित केली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

सौदी अरेबिया आणि यमन आता मध्य पूर्वेत युद्धाचं केंद्र बनलं आहे. या दोन्ही देशातील हल्ल्यात इस्लामचे सर्वात पवित्र शहर असलेल्या मक्काच्या पावित्र्याकडेही लक्ष दिलं जात नाहीये. मक्का शहरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा सौदीने केला आहे. बुधवारी आम्ही हुती बंडखोरांचं एक ड्रोन पाडलं. हे ड्रोन मक्का शहराच्या दिशेने जात होतं, असं सौदीच्या नेतृत्वाने म्हटलं आहे. तर हुती बंडखोरांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे पवित्र मक्का शहरावरील हल्ल्याच्या दाव्याप्रतिदाव्याने जगालाही संभ्रमात टाकलं आहे.
सौदी अरबचे प्रवक्ते तुर्की अल-मलिकी यांनी ट्विट करून या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. या पवित्र ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी आलेल्या सामान्य नागरिकांना घाबरवण्याचा हा प्रयत्न आहे. पवित्र ठिकाणी येणाऱ्यांची सुरक्षा म्हणजे आमच्यासाठी रेड लाइन आहे. त्याला नुकसान पोहोचवण्याचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला जाईल, असं तुर्की अल-मलिकी यांनी म्हटलं आहे.
अन् अलर्ट जारी
दरम्यान, या हल्ल्यानंतर अलर्टही जारी करण्यात आला होता. 2017 नंतर पहिल्यांदाच मक्कामध्ये सुरक्षेबाबतचा अलर्ट देण्यात आला होता. सौदी अरबच्या नागरिक सुरक्षा विभागाने मंगळवारी देशाच्या पश्चिमी तटावरील अनेक शहरात अलर्ट जारी केला होता. यात पवित्र मक्का, जेद्दा आणि तैफ प्रांताचा समावेश होता. दरम्यान, धोका टळल्याचं दिसून आल्यावर हा अलर्ट मागे घेण्यात आला आहे.
हल्ला झालाच नाही
दुसरीकडे, यमनच्या हुती बंडखोरांनी मक्का वा अन्य कोणत्याही इस्लामी पवित्र स्थळाला टार्गेट केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. आमच्याकडून पवित्र ठिकाणांना निशाणा करण्यात आल्याची बातमी खोटी आहे. हुती बंडखोरांचे पॉलिट ब्यूरोचे हाजेम अल-असद यांनी ट्विटरवर पोस्टवर खुलासा केला आहे. मक्कावर हल्ला करण्यात आला नाही. आमच्या बाबत खोटं पसरवलं जात आहे. यापूर्वीही अशाच खोटा अफवा पसरवल्या गेल्या होत्या, असं हाजेम अल-असद यांनी म्हटलं आहे.
हल्ल्याचा निषेध
ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन (OIC) ने मक्का आणि मदीना परिसरात हुतीने केलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा या हल्ल्याचा हेतू होता. पवित्र स्थळ आणि मशिदीच्या पावित्र्याचं उल्लंघन करणं आणि जगभरातील मुस्लिमांच्या भावना भडकवण्याचा या मागचा हेतू होता, असं ओआयसीने म्हटलं आहे.
पवित्र स्थळ, मशीद आणि सामान्य नागरिकांच्या ठिकाणी हल्ला करणं हा दहशतवाद आहे. हे हल्ले इस्लामी मूल्य आणि आंतरराष्ट्रीय नियम-कायद्याच्या विरोधात आहे. पवित्र स्थळाला नुकसान पोहोचवणं अत्यंत चुकीचं काम आहे. हे कधीच मान्य होणार नाही आणि सहनही केलं जाणार नाही. त्यामुळेच असं करणाऱ्यांना तात्काळ पायबंद घालण्याची गरज आहे, असं ओआयसीचे जनरल सेक्रेटेरियटने म्हटलं आहे.
