सीरियात महिलांची नग्न परेड, हजारो लोकांचा मृत्यू, नवे सरकार आणि असद समर्थकांमध्ये तणाव वाढला

सीरियातील हिंसाचारात एक हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सीरियाच्या हंगामी सरकारने बशर अल असद यांच्या समर्थकांवर हल्ले सुरू केले आहेत. किनारपट्टी भागात सरकारने मोठ्या संख्येने सैन्य तैनात केले आहे. असद समर्थकांशी लढण्यासाठी त्यांना पाठवण्यात आले आहे.

सीरियात महिलांची नग्न परेड, हजारो लोकांचा मृत्यू, नवे सरकार आणि असद समर्थकांमध्ये तणाव वाढला
Syria women
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 10, 2025 | 5:27 PM

सीरियात झालेल्या रक्तपातात किमान एक हजार जणांचा मृत्यू झाला आहे. सीरियाचे हंगामी अध्यक्ष अहमद अल-शारा (अबू मोहम्मद अल-जुलानी) सरकारच्या HTS सुरक्षा दलांनी अलावी लोकांवर प्रचंड हिंसाचार सुरू केला आहे. सीरियात दोन दिवसांत हजारो लोकांचा बळी गेला आहे. यातील बहुतेक माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे निष्ठावंत सामान्य नागरिक आहेत, जे अलावी समुदायातून येतात. या समाजातील महिलांवरील अत्याचारही झाले आहेत. महिलांना रस्त्यावर नग्न अवस्थेत फिरवण्यासारख्या घटनाही घडल्या आहेत.

ब्रिटनस्थित सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्सने (एसओएचआर) सांगितले की, सीरियात शुक्रवार आणि शनिवारी अलावी समुदायाला लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यात किमान 745 नागरिक ठार झाले. याशिवाय 125 सरकारी दल आणि 148 असद समर्थक मारले गेले आहेत. लटाकिया शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील वीज आणि पाणी पुरवठाही खंडित करण्यात आला आहे. येथे अलावी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात.

रस्त्यावर गोळीबार

गुरुवारी असद समर्थक लताकिया भागात सीरियाच्या सुरक्षा दलांवर हल्ला केल्यानंतर हिंसाचार उसळला. हा भाग असद समर्थक अल्पसंख्याक अलावी लोकांचा बालेकिल्ला आहे. यानंतर सरकारच्या सुरक्षा दलांनी अलावींना ठार मारण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, अलावी महिला सापडल्या आणि त्यांना नग्न अवस्थेत फिरवण्यात आले आणि नंतर गोळ्या घातल्या गेल्या. अगदी एका अलावी मुलाला रायफल देऊन त्याच्याच कुटुंबाला गोळ्या घालण्यास भाग पाडण्यात आले.

बनियास शहरातील एका रहिवाशाने स्काय न्यूजला सांगितले की, सुरक्षा दलांनी लोकांना जबरदस्तीने रस्त्यावर उतरवले आणि गोळीबार सुरू केला. त्याने कोणालाही सोडले नाही. स्थानिक अली शेहा यांनी सांगितले की, बनियास शहरात त्यांचे किमान 20 शेजारी आणि सहकारी मारले गेले. काही लोक खरेदी करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. घरे फोडून लोकांची हत्या करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने लोकांनी आपली घरे रिकामी करून पळ काढला आहे.

सामूहिक कबरीत दफन

वेधशाळेचे प्रमुख रामी अब्दुररहमान यांनी सांगितले की, शनिवारपासून हिंसाचार कमी झाला आहे, परंतु तोपर्यंत शेकडो निरपराध नागरिक मारले गेले होते. अलावी भागातील परिस्थिती इतकी बिकट आहे की, लोकांना सामूहिक कबरीत दफन करण्यात आले आहे. सीरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, किनारपट्टीभागातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, असद समर्थक सत्तेत असलेल्या बहुतेक भागांवर सरकारी सैन्याने ताबा मिळवला आहे.

नव्या सरकारने सुरक्षा दलांवरील हल्ल्यांसाठी असद यांच्या निष्ठावंतांना जबाबदार धरले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अल-जुलानी यांच्या नेतृत्वाखालील HTS ने असद यांना सत्तेतून हटवले होते. तो सध्या रशियात आश्रय घेत आहे. जुलानी हे सिरियन सरकारचे नेतृत्व करत आहेत. सीरियात 2011 पासून यादवी युद्ध सुरू आहे. पाच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोक विस्थापित झाले आहेत.