
तीन दिवसांपूर्वी सौदी अरेबियात भीषण रस्ते अपघात झाला. यामध्ये 42 भारतीयांचा मृ्त्यू झाला. 35 वर्षीय सय्यद राशीदच या अपघातात मोठं नुकसान झालं. मदीनाजवळ झालेल्या या अपघातात सय्यदने त्याच्या कुटुंबातील 18 सदस्यांना गमावलं. काही दिवसांपूर्वी ते सर्व सौदी अरेबियाला निघाले होते. त्यावेळी सय्यद त्यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर गेलेला. आता पुन्हा कधी आपण यांना पाहू शकणार नाही, असा पुसटसा विचारही त्याच्या मनात आला नसेल. या अपघातात सय्यदने त्याच्या पालकांना गमावलं. 65 वर्षीय वडिल शेख नासीरुद्दीन. ते निवृत्त रेल्वे कर्मचारी होते. 60 वर्षीय आई अख्तर बेगम, 38 वर्षीय भाऊ, 35 वर्षांची वहिनी आणि त्यांची तीन मुलं या भीषण अपघातात त्याने गमावली.
मृतांमध्ये अमेरिकेत राहणारा सिराजुद्दीन, त्याची पत्नी साना आणि त्यांची मुलं, नातेवाईक अमिना बेगम तिची मुलगी शमीना बेगम, मुलगा रिझवान बेगम आणि त्यांची दोन मुलं यांचा सुद्धा अपघातात मृत्यू झाला. विद्यानगर सीपीआय (एम) मार्क्स भवन येथे राहणाऱ्या सय्यद राशिद स्वत: 9 नोव्हेंबरला कुटुंबाला निरोप देण्यासाठी हैदराबाद विमानतळावर आलेला. उमराहसाठी हे सर्व कुटुंब सौदी अरेबियाला गेलं होतं. सय्यद राशिदने मुलांसोबत एकत्र प्रवास करु नका असं निरोप देताना कुटुंबाला सांगितलं होतं.
असा विचारच माझ्या मनात कधी आला नाही
“मी कल्पनाच करु शकत नाही. मी त्यांना शेवटचं बघतोय, असा विचारच माझ्या मनात कधी आला नाही. माझं ऐकलं असतं तर त्यातले काही वाचले असते” असं सय्यद राशिद म्हणाला. कारण मुलांसोबत एकत्र प्रवास करु नका असं त्याने सांगितलं होतं. दुसऱ्या एका नातेवाईकाने त्याच्या कुटुंबातील पाच जणांना गमावलं. यात दोन मेहुणे, सासू आणि भाची असा परिवार आहे. “जेव्हा, मला बसमधील सर्वांचा मृत्यू झाल्याच सांगितलं, तेव्हा मला धक्का बसला. मी सरकारला विनंती करेन की, त्यांचे मृतदेह भारतात आणावेत” असं हा नातेवाईक म्हणाला. सोमवारी सकाळी हे भारतीय बसमधून मक्का येथून मदीना येथे चाललेले. त्याचवेळी बसची डिझेल टँकर बरोबर धडक झाली. हे सर्व तीर्थयात्री उमराह अदा करण्यासाठी गेले होते.