मोठी बातमी! बांगलादेशचा भारताला दणका, महत्त्वाची सेवा केली बंद, हजारो भारतीयांना फटका बसणार

Ind vs Ban : भारत आणि बांगलादेशातील तणाव वाढला आहे. बांगलादेशने भारताला मोठा दणका देत बांगलादेश उच्चायोगाने भारतीयांसाठी व्हिसा सेवा निलंबित केल्या आहेत. याचा फटका हजारो भारतीयांना बसण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! बांगलादेशचा भारताला दणका, महत्त्वाची सेवा केली बंद, हजारो भारतीयांना फटका बसणार
ind bangladesh relation
| Updated on: Dec 22, 2025 | 10:57 PM

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात अस्थिरता आहे. भारताच्या या शेजारील देशात जाळपोळ आणि हिंसक आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे भारत आणि बांगलादेशातील तणाव वाढला आहे. रविवारी भारताने बांगलादेशातील चितगाव येथील भारतीय व्हिसा अर्ज केंद्र (IVAC) येथील व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी निलंबित केल्या होत्या. त्यानंतर आता बांगलादेशने भारताला मोठा दणका देत बांगलादेश उच्चायोगाने भारतीयांसाठी व्हिसा सेवा निलंबित केल्या आहेत. याचा फटका हजारो भारतीयांना बसण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारताकडूनही व्हिसा सेवा बंद

रविवारी भारताने बांगलादेशातील खुलना, राजशाही आणि चितगाव येथील व्हिसा सेवा निलंबित केल्या होत्या. याआधी चितगावमध्ये हिंसक निदर्शने झाली होती, त्यावेळी आंदोलकांनी व्हिसा कार्यालयावर दगडफेक केली होती. यामुळे भारताने सेवा थांबवल्या होत्या, त्यानंतर आता बांगलादेशानेही नवी दिल्लीतील सेवा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश उच्चायोगाने हा निर्णय घेतला आहे.

शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर भारताविरोधात घोषणाबाजी

बांगलादेशने भारताच्या व्हिसा सेवा निलंबित करण्याच्या या निर्णयाकडे बदला म्हणून पाहिले जात आहे. याचा भारतीय नागरिकांवर परिणाम होणार आहे. भारतातून बांगलादेशात जाणाऱ्यांची संख्या कमी आहे, फक्त पत्रकार आणि काही व्यावसायिक या देशात भेट देत असतात, मात्र आता अशा लोकांनी बांगलादेशात प्रवेश करता येणार नाही. बांगलादेशमधील युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर हिंसक आंदोलन झाले होते, यात भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या, त्यामुळे भारताने व्हिसा सेवा निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता.

हादीची हत्या कशी झाली?

ढाकाच्या बिजॉयनगर भागात 12 डिसेंबर रोजी निवडणूक रॅलीदरम्यान मास्क लावलेल्या काही हल्लेखोरांनी हादी यांच्या डोक्यात गोळी झाडली होती. त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आले होते, मात्र गुरुवारी त्यांचे निधन झाले. हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशात हिंसाचार उसळला होता, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. हादीच्या अंत्यसंस्कारादरम्यान जमावाने भारतविरोधी घोषणाबाजी देखील केली. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. आता दोन्ही देशांनी एकमेकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.