
जागतिक स्तरावर भारताची ताकद वाढत आहे. अलिकडेच ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित लोवी इन्स्टिट्यूटने वार्षिक आशिया पॉवर इंडेक्स 2025 अहवाल जारी केला आहे. यात 27 आशियाई देशांच्या लष्करी, आर्थिक, राजनैतिक आणि सांस्कृतिक ताकदीचा उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालानुसार चीन आशियातील प्रमुख शक्ती म्हणून उदयास येत आहे. तसेच भारताची ताकदही आशियात वाढत असल्याचे यातून समोर आले आहे. मात्र दुसरीकडे अमेरिकेचा आशियातील प्रभाव काहीसा कमी होताना पहायला मिळत आहे.
लोवी इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या अहवाताय आठ क्षेत्रांवर फोकस करत देशांची क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. यात लष्करी क्षमता, संरक्षण नेटवर्क, आर्थिक ताकद, राजनैतिक प्रभाव, सांस्कृतिक पोहोच, लवचिकता आणि भविष्यातील संसाधन क्षमता या क्षेत्रांचा समावेश आहे. या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर असून पाकिस्तानची अवस्था वाईट आहे. पाकिस्तान 16 व्या क्रमांकावर आहे.
लोवी इन्स्टिट्यूटच्या या अहवालात आशियातील भारताच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारत 2025 मध्ये 40.0 गुणांसह प्रमुख शक्ती म्हणून उदयास आला आहे. भारताच्या ताकदीतील वाढ त्याच्या मजबूत आर्थिक विकासामुळे आणि वाढलेल्या लष्करी क्षमतांमुळे झाली आहे. मात्र भारताचा राजनैतिक आणि आर्थिक प्रभाव अजूनही कमी आहे.
या अहवालात महासत्ता म्हणून अमेरिका आणि चीन यांना स्थान देण्यात आले आहे. अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, मात्र 2018 मध्ये आशिया पॉवर इंडेक्स सुरू झाल्यापासून त्यांना सर्वात कमी गुण मिळालेले आहेत. ट्रम्प सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांचा फटका अमेरिकेला बसलेला आहे. जपान या यादीत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे रशियाचीही ताकद वाढताना दिसत आहे. रशिया या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया या देशांचाही टॉप 10 देशांमध्ये समावेश आहे.