
भारत-पाकिस्तान तणावाने टोक गाठलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान विरोधात सातत्याने निर्णय घेत आहे. तिथे पाकिस्तान नेहमीप्रमाणे आपले हात वर करुन मोकळा झाला आहे. आमचा या दहशतवादी हल्ल्याशी काही संबंध नसल्याच पाकिस्तान सांगतोय. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानकडून तटस्थ चौकशीची मागणी सुरु आहे. भारत-पाकिस्तान तणावात अमेरिकेची भूमिका सुद्धा महत्त्वाची ठरते. जगातील हा शक्तीशाली देश कोणाची साथ देणार? याकडे सगळ्या जगाच लक्ष लागलं आहे. भारत-अमेरिकेमध्ये तसे चांगले संबंध आहेत. पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची केमिस्ट्री जगजाहीर आहे. सध्याच्या स्थितीत अमेरिकेची भूमिका बॅलन्स संतुलित आहे. अमेरिका दोन्ही देश भारत-पाकिस्तानसोबत चर्चा करतोय.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॅमी ब्रूस म्हणाले की, “आमची दोन्ही देशांसोबत चर्चा सुरु आहे. वेगवेगळ्या स्तरावर बोलणी सुरु आहेत. अमेरिका दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा करेल. तिथे घडणाऱ्या घटनाक्रमावर आमचं लक्ष आहे” “भारत-पाकिस्तानच्या सरकारसोबत आम्ही वेगवेगळ्या स्तरावर संपर्कात आहोत. हा संपर्क फक्त परराष्ट्र मंत्री स्तरावर नाही, तर वेगवेगळ्ला लेव्हलवर आहे” असं ब्रूस म्हणाले. “जबाबदारीपूर्वक तोडगा काढण्यासाठी दोघांनी मिळून काम करावं असा आमचा प्रयत्न आहे. जगाचं याकडे लक्ष लागलं आहे. माझ्याकडे यावेळी कुठलीही अतिरिक्त माहिती नाहीय” असं टॅमी ब्रूस म्हणाले.
भारत अमेरिकेचा एक महत्त्वपूर्ण पार्टनर आहे. कारण अमेरिकेला चीनच्या वाढत्या वर्चस्वाचा सामना करण्यासाठी भारताची गरज आहे. पाकिस्तान सुद्धा वॉशिंग्टनचा सहकारी बनला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी हल्ल्याचा निषेध केल्यानंतर वॉशिंग्टनने सार्वजनिकरित्या भारताप्रती समर्थन व्यक्त केलं. परंतु त्यांनी पाकिस्तानची निंदा केली नाही.