
भारतावर लादलेला 50 टक्के टॅरिफ आणि H-1B व्हिसाच्या शुल्ताक केलेली गसगशीत वाढ, ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे भारत सध्या अमेरिकेच्या हिटलिस्टवर आहे, असंच म्हणावं लागेल. मात्र आता अमेरिकेला उपरती होत असून परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या एका विधानामिे भारत-अमेरिकेच्या संबंधांबाबत शुभ संकेत दिसत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर लादलेला मोठा टॅरिफ फिक्स करण्यास तयार आहेत, असं विधान रुबिया यांनी केलं. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे हे शुल्क लादण्यात आले होते, असेही ते म्हणाले. त्याच वेळी, युक्रेन युद्धाबाबत अमेरिका रशियावर नवीन निर्बंध लादण्याचा विचार करत आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतरच भारत-अमेरिकेतील संबंधांचे समीकरण बदलू लागले. त्यानंतर, रशिया-युक्रेन मुद्द्यावरून दोन्ही देशांमधील तणाव वाढला. परिस्थिती अशी झाली की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर केवळ 50 टक्के कर लादला नाही तर या काळातील सर्वात मोठ्या युद्धासाठी भारत जबाबदार आहे अशी विधानेही केली. त्याचा केवळ भारत आणि अमेरिकेतील संबंधांवरच परिणाम झाला नाही तर व्यापारावरही परिणाम दिसून आला. मात्र, आता दोन्ही देशांमधील बर्फ थोडा वितळताना दिसत आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधारण्याची चिन्हं
न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 80 व्या सत्रादरम्यान मार्को रुबियो यांनी सोमवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे आणि रशियाकडून भारताच्या ऊर्जा आयातीमुळे वाढलेल्या तणावानंतर ही पहिलीच बैठक होती. “भारत हा अमेरिकेसाठी एक अतिशय महत्त्वाचा भागीदार आहे” असे यूएनजीसीमध्ये एस. जयशंकर यांची भेट घेतल्यानंतर रुबियो म्हणाले. त्यांनी भारताचे नियुक्त राजदूत सर्जियो गोर यांचीही भेट घेतली.
मोदी-ट्रम्प यांची होणार भेट ?
भारत आणि अमेरिकेतील तणाव निर्माण झाल्यापासून, पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त सोशल मीडियावर संवाद साधला आहे. गेल्या आठवड्यात ( 17 सप्टेंबर) पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त, ट्रम्प यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, त्याचीही बरीच चर्चा झाली. UNGC बैठकीत दोघे भेटू शकतात असे मानले जात होते, परंतु परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे त्या बैठकीत सहभागी होत असल्याची घोषणा झाल्याने ही शक्यताही धुळीस मिळाली. असं वातावरण असतानाचा, आता परिस्थिती सामान्य होत असल्याचे दिसून येत आहे, तेव्हा पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यात लवकरच बैठक व्हावी आणि चर्चा पुढे सरकावी यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न केले जात आहेत.
मार्को रुबियो भारताबद्दल काय म्हणाले?
भारताबाबत रुबियो म्हणाले, “आम्ही भारताविरुद्ध काही पावले उचलली आहेत, परंतु आम्हाला आशा आहे की ती दुरुस्त केली जाऊ शकतील. राष्ट्रपतींकडे इतर पर्याय आहेत आणि ते पुढील पावले उचलण्याचा विचार करत आहेत.” असं त्यांनी नमूद केलं. मार्को रुबियो यांचे विधान दोन्ही देशांमधील संबंधांसाठी सकारात्मक संकेत म्हणून पाहिले जात आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या अमेरिकेच्या भेटींच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या परिस्थितीत हे विधान अत्यंत महत्त्वाचे ठरते. काही महिन्यांपूर्वीच ट्रम्प प्रशासनाने भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर लादल्याने एकूण कर 50 टक्के झाला आहे. जो जगातील सर्वाधिक करांपैकी एक आहे.