US Attack On Iran Nuclear Plant : 13,600 किलोचा बॉम्ब पडल्यानंतर रेडिएशन लीकबद्दल इराणकडून पहिलं स्टेटमेंट
US Attack On Iran Nuclear Plant : इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिका उतरली आहे. इस्रायलकडून मागच्या काही दिवसांपासून इराणवर सतत हल्ले सुरु आहेत. आज अमेरिकेने इराणच्या तीन अणवस्त्र प्रकल्पावर बॉम्ब हल्ला केला. यासाठी अमेरिकेने आपली अत्यंत घातक शस्त्र वापरली. काहीही करुन इराणला अणवस्त्र संपन्न देश बनू देणार नाही, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच जाहीर केलं होतं.

मागच्या अनेक दिवसांपासून जी चर्चा होती, ती अखेर आज खरी ठरली. अमेरिकेने आज इराणच्या फॉर्डो, नतांज आणि एस्फाहान या तीन अणू प्रकल्पांवर शक्तीशाली बंकर बस्टर बॉम्बने हल्ला केला. या बॉम्बला GBU-57 सुद्धा म्हटलं जातं. अमेरिकेने हा हल्ला करण्यासाठी आपल्या ताफ्यातील सर्वात घातक B-2 स्पिरिट बॉम्बर विमान वापरलं. नतांज आणि एस्फाहानवर याआधी सुद्धा इस्रायलने हल्ले केले होते. पण फॉर्डो हा महत्त्वाच न्यूक्लियर प्लांट आहे. डोंगराळ भागात असलेला हा प्लांट जमिनीखाली बांधण्यात आला आहे. आज जसा अमेरिकेने हल्ला केला, तसा अमेरिका-इस्रायलकडून कधीही हल्ला होऊ शकतो, हीच शक्यता गृहित धरुन इराणने जमिनीखाली काहीशे फुटावर हा अण्विक प्रकल्प उभारला होता. फॉर्डोचा बेस एक अभेद्य किल्ल्यासारखा मानला जातो.
त्यामुळे फॉर्डोचा तळ उडवण्यासाठी अमेरिकेला आपल्या भात्यातील दोन मोठी शस्त्र B-2 स्पिरिट बॉम्बर आणि GBU-57 वापरावं लागलं. GBU-57 बॉम्बच वजन 13,600 किलो आहे. त्यामुळे फॉर्डोचा तळ उडवण्यासाठी भूगर्भात खोलवर जाऊन हल्ला करणाऱ्या शस्त्राची गरज होती. अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर आता इराणची पहिली प्रतिक्रिया आली आहे. आमच्या न्यूक्लियर साइट्सच काही नुकसान झालेलं नाहीय. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. सोबतच रेडिएशन लीकचा धोकाही इराणने फेटाळून लावलाय.
हल्ल्यानंतर इराणच्या अणूऊर्जा संस्थेने काय म्हटलं?
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर अणवस्त्र प्रकल्पाच्या ठिकाणी रेडिएशन लीक होण्याचा धोका नाही असं इराणची अणूऊर्जा संस्था AEOI ने रविवारी म्हटलं. इराणी सरकारी मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्याने ही माहिती समोर आलीय. सुरक्षा तपासणीत कुठलही रेडिएशन लीक समोर आलेलं नाही. देशाचा अणवस्त्र विकास कार्यक्रम थांबणार नाही असं इराणी अणूऊर्जा संस्थेने म्हटलय.
आता AEOI पुढे काय करणार?
अमेरिकेचा हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याच उल्लंघन असल्याच इराणच्या अणूऊर्जा संस्थेने म्हटलं आहे. एजन्सी आपल्या राष्ट्रीय हितासाठी कायदेशी कारवाईची प्रक्रिया सुरु करेल असं AEOI ने म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या हल्ल्याचा निषेध करावा व शांततामय मार्गाने अणू कार्यक्रम विकसित करण्याच्या इराणच्या अधिकाराच समर्थन करण्याची मागणी केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
इराणने अशी प्रतिक्रिया दिली असली, तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे एक यशस्वी ऑपरेशन असल्याच म्हटलं आहे. फॉर्डो सेंटर हा इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाचा महत्त्वाचा हिस्सा होता.
