युद्ध समाप्तीचा क्षण आलाच, इराणने त्या गोष्टीसाठी दिला होकार; पाकिस्तानात…अमेरिकेकडे जगाचे लक्ष!
आखाती प्रदेशातील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे. परंतु अमेरिकेने ठेवलेल्या अटी इराणला मान्य नाहीत. या सर्व घडामोडी घडत असतानाच आम्ही पाकिस्तानात चर्चेला येण्यास कधीच नकार दिलेला नाही, असे मत इराणने व्यक्त केले आहे.

Iran War : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आजचा 36 वा दिवस आहे. अमेरिका आणि इस्रायल हे इराणवर हल्ले करत आहेत. तर इराणही या दोन्ही देशांना जशास तसे उत्तर देत आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झालेला आहे. एकीकडे हे युद्ध दिवसेंदिवस भडकत असताना दुसरीकडे हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांत पाकिस्तान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दरम्यान, युद्धविरामाच्या प्रयत्नांबाबत इराणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
इराणने नेमकी काय भूमिका स्पष्ट केली?
अमेरिका, इस्त्रायलसोबतच्या युद्धाबाबत इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिकन मीडिया आमची चुकीची प्रतिमा निर्माण करत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. तसेच अराघची यांनी पाकिस्तानचे आभार मानत युद्धावर चर्चा करण्यास तयार असल्याचेही म्हटले आहे. परंतु अमेरिकेने ठेवलेल्या अटी आम्हाला मान्य नाहीत, याबाबत आम्ही चिंतेत आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.
अराघची नेमकं काय म्हणाले?
अराघची यांनी सोशल मीडियावर इराणची भूमिका स्पष्ट केली आहे. “अमेरिकन माध्यमे आमची भूमिका चुकीच्या पद्धतीने दाखवत आहेत. पाकिस्तानकडून जे प्रयत्न केले जात आहेत, त्याबद्दल आम्ही पाकिस्तानचे आभारीच आहोत. आम्ही चर्चेसाठी इस्लामाबादल जाण्यास कधीही नकार दिलेला नाही. आम्ही चर्चेसाठी इस्लामाबादला जाऊ. परंतु अवैध पद्धतीने थोपवलेले हे युद्ध समाप्त करण्यासाठी समोर ठेवण्यात आलेल्या अटी आमच्यासाठी चिंताजनक आहेत,” असे अराघची म्हणाले आहेत.
युद्ध थांबणार का?
दरम्यान, पाकिस्तानकडून केले जाणारे हे प्रयत्न सुरुवातीच्या टप्प्यातच अयशस्वी झाले आहेत, असा दावा केला जात होता. पाकिस्तानने मात्र हे दावे फेटाळून लावले आहेत. त्यामुळे आता इराणच्या या भूमिकेमुळे आता भविष्यात युद्ध थांबणार का? इराणने नोंदवलेल्या आक्षेपांवर अमेरिका विचार करणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोबतच हे युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानच्या प्रयत्नांना यश येणार का? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.