Iran – US : पाकिस्तानच्या मध्यस्थीचे तीन तेरा, जगाला हादरवणारी घटना, पुन्हा उडणार युद्धाचा भडका? घोंगावतंय मोठं संकट…

अमेरिका-इराण यांच्यात इस्लामाबादमध्ये झालेली 21 तासांची चर्चा कोणत्याही कराराशिवाय संपली. ही चर्चा निष्फळ ठरल्यामुळे दोन्ही देशांतील 2 आठवड्यांच्या शस्त्रसंधीबद्दलही प्रश्न उपस्थित झाला आहे. इराण अमेरिकेत एकमत न झाल्याने काहीच तोडगा निघाल्याने आता पुन्हा युद्ध सुरू होणार का असा सर्वात मोठा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

Iran - US : पाकिस्तानच्या मध्यस्थीचे तीन तेरा, जगाला हादरवणारी घटना,  पुन्हा उडणार युद्धाचा भडका? घोंगावतंय मोठं संकट...
इराण-अमेरिका संघर्ष
Image Credit source: social media
| Updated on: Apr 12, 2026 | 10:13 AM

यद्धविरामाच्या घोषणेनंतर इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेली प्रदीर्घ चर्चा ही निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमधील युद्ध पुन्हा भडकणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. इराण-अमेरिकेत जवळपास 21 तास चर्चा झाली, मात्र या प्रदीर्घ चर्चेनंतरही दोन्ही देश कोणत्याही करारावर पोहोचू शकले नाहीत. ही चर्चा फिस्कटली असून, या अपयशामुळे केवळ शांतता प्रक्रियेलाच धक्का बसला नाही, तर संपूर्ण मध्य-पूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याचं अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी स्पष्टपणे सांगितलं. ते म्हणाले, “आमची 21 तास गहन चर्चा झाली, पण आम्ही कोणत्याही करारावर पोहोचू शकलो नाही.” अमेरिकेने “अंतिम आणि सर्वोत्तम प्रस्ताव” दिला असून, आता निर्णय घेणे इराणवर अवलंबून आहे, असा दावाही त्यांनी केला.

जेडी व्हान्स यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झालं की, अजूनही या दोन्ही देशांमधील मतभेद तीव्र आहेत. विशेषतः अणुकार्यक्रम आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या मुद्द्यांवर कोणतंही एकमत अथवा करार झालेला नाही. जेडी व्हान्स यांनी आपल्या पत्रकार परिषदेत होर्मुझच्या सामुद्रधुनीवर चर्चाही केली नाही. इराण आपला युरेनियम संवर्धनासारखा अणुकार्यक्रम सोडून देण्यास तयार नाही, पण दुसरीकडे अमेरिकेने तो पूर्णपणे नष्ट करण्याची मागणी केली आहे.

ट्रम्प यांचं म्हणणं काय ?

दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिकाही बरीच कठोर आणि विरोधाभासी वाटली.”करार होवो वा न होवो, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही आधीच जिंकलो आहोत.” असं ते म्हणाले होते. या विधानावरून असं दिसून आलं की, अमेरिका तडजोडीला बळी पडण्याऐवजी सध्या तरी आपले दबावतंत्र सुरू ठेवू इच्छिते. मात्र, नेमक्या याच गोष्टीमुळे परिस्थिती आणखी धोकादायक बनू शकते. कारण दोन्ही देशांमधील वाटाघाटींमध्ये जर प्रगती झाली नाही, तर दोन आठवड्यांची शस्त्रसंधीसुद्धा मोडली जाऊ शकते. आणि तसं झालं तर 40 दिवस अविरत सुरू होते, ते युद्ध पुन्हा भडकण्यास फार वेळ लागणार नाही.

“ईरान ऑपरेशन अजून संपल नाहीये “

दरम्यान इस्रायलकडून येणारे संकेतही सकारात्मक नाहीत. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी चर्चेदरम्यान एका व्हिडिओ संदेशात स्पष्टपणे सांगितलं की, “ही मोहीम अजून संपलेली नाही. आम्ही अजूनही लढत आहोत.” पुढे त्यांनी असंही सांगितलं की, इराणकडे अजूनही संवर्धित युरेनियम आहे, जे कराराद्वारे किंवा इतर मार्गांनी नष्ट केलेच पाहिजे. याचा स्पष्ट अर्थ असा की, अमेरिका-इरामधील राजनैतिक वाटाघाटी अयशस्वी ठरल्या, तर लष्करी पर्याय अजूनही उपलब्ध आहेत.

होर्मुजवरून मतभेद कायम

होर्मुझची सामुद्रधुनी या संपूर्ण संघर्षाचे केंद्रस्थान आहे. हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी तेल मार्गांपैकी एक आहे. इराणने स्पष्टपणे सूचित केलं होतं की जोपर्यंत त्यांच्या अटी पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हा होर्मुजची सामुद्रधीनी पूर्णपणे उघडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र हा मार्ग बंद राहिला, तर जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होऊ शकतो आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल. म्हणूनच या वाटाघाटींचा परिणाम केवळ अमेरिका आणि इराणपुरता मर्यादित नाही; संपूर्ण जगांचही त्यावर बारकाईने लक्ष आहे.

इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत पेरलेले सुरुंग हटवण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत असल्याचे वृत्त चर्चेदरम्यान समोर आले. या उद्देशासाठी दोन डिस्ट्रॉयर तैनात करण्यात आले असून, त्या दोन्हींनी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडल्याचा दावा करण्यात आला आहे. तथापि, इराणने म्हटले आहे की, इराणकडून इशारा मिळाल्यानंतर अमेरिकेच्या विनाशिका परतल्या आहेत. इतकेच नव्हे तर, असा प्रयत्न झाल्यास इराण हल्ला करेल, असा इशाराही इराणने दिला आहे.

इराण-अमेरिकेची चर्चा निष्फळ ठरल्यानतंर सध्या परिस्थिती पूर्णपणे अनिश्चित आहे. एकीकडे अमेरिका ‘अंतिम प्रस्तावा’बद्दल बोलत आहे, तर दुसरीकडे इराण मात्र त्यांचे ‘हक्क’ सोडायला तयार नाही. अशा परिस्थितीत, एकतर इराण अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारेल, किंवा दोन्ही देश नव्याने वाटाघाटी सुरू करतील. पण जर यापैकी काहीही झाले नाही, तर युद्ध पुन्हा सुरू होण्याचा मोठा धोका घोंगावत आहे.

Follow Us