
संपूर्ण जगाची चिंता वाढवणारी बातमी आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्व आशियात परिस्थिती बिकट बनली आहे. इराणने केलेल्या पलटवारामुळे इस्रायलसह अमेरिकेचीही झोप उडाली आहे. दोन्ही बाजूंनी सतत हल्ले होत आहेत. इराण मध्यपूर्वेतील इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करत आहे. या युद्धाच्या काळात भारताची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भारताने या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे आणि आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, ‘इराण आणि आखातातील अलिकडच्या घडामोडींमुळे भारताला खूप चिंता आहे. आम्ही सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे, तणाव वाढू नये आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन करतो. तणाव कमी करण्यासाठी आणि अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि राजनैतिक कूटनीतिचा अवलंब केला पाहिजे.’
भारताने अमेरिका इस्रायल विरूद्ध इराण यांच्यातील युद्धावर बोलताना म्हटले की, ‘सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे. आम्ही या प्रदेशातील भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहोत. आम्ही आमच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे, मोहिमांच्या संपर्कात राहण्याचे आणि स्थानिक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.’ दरम्यान, भारतासह जगातील इतरही अनेक देशांनी या तिन्ही देशांनी युद्ध थांबवण्याचे आणि वाटाघाटी करून प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले आहे.
इराण आणि इस्रायल-अमेरिकेकडून सतत एकमेकांवर हल्ले होत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी, इराणवरील हल्ल्यांमुळे इराणींना स्वतःचे नशीब स्वतःच्या हातात घेण्याची संधी मिळेल. अयातुल्ला सरकारने आपल्या नागरिकांवर अत्याचार केले आहेत. त्यांनी या प्रदेशातील लोकांमध्ये भीती निर्माण केली आहे. त्यांनी जगभरात दहशतीचे एक मोठे जाळे पसरवले आहे. त्याचबरोबर अणुबॉम्ब आणि हजारो क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठी संसाधने समर्पित केली आहेत. इराणी सरकारचे उद्दिष्ट इस्रायलला जगाच्या नकाशावरून पुसून टाकणे आहे.”