भयंकर युद्धाला सुरूवात, इस्रायलकडून भीषण हल्ला; 7 जणांचा मृत्यू, मध्यपूर्वेत खळबळ

Israel Attack : इस्रायलने दक्षिण लेबनानमध्ये शनिवारी भीषण हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये किमान सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

भयंकर युद्धाला सुरूवात, इस्रायलकडून भीषण हल्ला; 7 जणांचा मृत्यू, मध्यपूर्वेत खळबळ
Israel Attack
Image Credit source: Google
| Updated on: May 03, 2026 | 5:03 PM

गेल्या काही काळापासून युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडालेली आहे. अजूनही मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण आहे. अशातच आता इस्रायलने दक्षिण लेबनानमध्ये शनिवारी भीषण हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये किमान सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. इस्रायलने दक्षिणेकडील नऊ गावांतील रहिवाशांना तेथून स्थलांतर करण्याचे आवाहन केले होते, त्यानंतर आता हा हल्ला केला आहे. इस्रायली सैन्य आणि लेबनानमधील अतिरेकी संघटना हिजबुल्ला यांच्यात 17 एप्रिलपासून युद्धविरामाची घोषणा झाली होती, मात्र अजूनही इस्रायलकडून हल्ले सुरू आहेत.

7 जणांचा मृत्यू

लेबनानची सरकारी वृत्तसंस्था नॅशनल न्यूज एजन्सीने या हल्ल्याबाबत माहिती दिली आहे. यानुसार कफर दजल या गावात एका कारवर हवाई हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. तर लुवायजेह गावात एका घरावर झालेल्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला. याशिवाय आणखी एका गावावर झालेल्या हल्ल्यात दोन जणांचा जीव गेला आहे. या हल्ल्यात एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

24 तासांत 50 हवाई हल्ले

इस्रायली सैन्याच्या प्रवक्त्या लेफ्टनंट कर्नल एला वावेया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटले की, ‘इस्रायलच्या वायुदलाने मागील 24 तासांत सुमारे 50 हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाच्या पायाभूत सुविधांवर आणि सदस्यांना लक्ष्य करण्यात आले.’ सीमावर्ती यारून गावात इस्रायली सैन्याने बुलडोझरच्या मदतीने एका कॅथोलिक कॉन्व्हेंट शाळेचा काही भाग पाडला. ही शाळा 2006 च्या इस्रायल-हिजबुल्ला युद्धानंतर बंद होती. तसेच तिथे एक क्लिनिकही होते, जे दुसऱ्या गावात हलवण्यात आले होते.

धार्मिक स्थळांचा हल्ल्यासाठी वापर

इस्रायली सैन्याने असेही म्हटले आहे की, हिजबुल्लाने यापूर्वी अनेक वेळा या परिसराचा वापर इस्रायलवर रॉकेट हल्ले करण्यासाठी केला होता. आता इस्रायली सैन्याने स्पष्ट केले की, आम्ही जाणूनबुजून धार्मिक स्थळांवर हल्ले करत नाही. तर दुसरीकडे लेबनानच्या कॅथोलिक चर्चने इस्रायलच्या दाव्यांना फेटाळले आहे. या परिसराचा सैनिकी कारवाईसाठी वापर करण्यात आलेला नाही असं चर्चने म्हटले आहे.

Follow Us