Israel vs Hezbolllah : हिज्बुल्लाहचा शेवट जवळ आला, चार दिवसात गेम ओव्हर, विमानातून पत्रक पाडून सांगितलं की…

Israel vs Hezbolllah : इस्रायलच्या 'ऑपरेशन नॉर्दर्न ॲरो' ने हिज्बुल्लाहच कंबरड मोडून टाकलं आहे. हिज्बुल्लाहचा चीफ हसन नसरल्लाह ज्या धमक्या देत होता, त्या पोकळ वल्गना होत्या हे सिद्ध झालय. इस्रायलने जो मिसाइल हल्ला केला, त्याचा एक दिवसाचा खर्चच 1500 कोटी रुपये आहे. इस्रायलने चार दिवसात लेबनानमध्ये काय घडवलय? त्यासाठी एकदा हे वाचा.

Israel vs Hezbolllah : हिज्बुल्लाहचा शेवट जवळ आला, चार दिवसात गेम ओव्हर, विमानातून पत्रक पाडून सांगितलं की...
Israel vs Hezbolllah
| Updated on: Sep 26, 2024 | 9:36 AM

इस्रायलसमोर लेबनान हतबल झाला आहे. एकापाठोपाठ एक इस्रायलकडून भीषण हवाई हल्ले सुरु आहेत. यात हिज्बुल्लाहच कंबरड मोडलं आहे. इस्रायल ज्या प्रकारची कारवाई करत आहे, ते हिज्बुल्लाहचा शेवट जवळ आल्याचे संकेत आहेत. गाजा पट्टीत हमासची जी स्थिती झाली, तीच हिज्बुल्लाहची अवस्था झाली आहे. चार दिवसांच्या ऑपरेशनमध्ये इस्रायलने हिज्बुल्लाहची 90 टक्के लीडरशिप संपवून टाकली. त्यांची निम्मी सैन्य शक्ती नष्ट केली. एकदम परफेक्ट इंटेलिजन्स आणि एकाच दिवसात मोठा मिसाइल हल्ला यामुळे इस्रायलला हे यश मिळालं. इस्रायलने जो मिसाइल हल्ला केला, त्याचा एक दिवसाचा खर्च 1500 कोटी रुपये आहे.

इस्रायलने हिज्बुल्लाह विरोधातील या कारवाईला ‘ऑपरेशन नॉर्दर्न ॲरो’ नाव दिलं आहे. या कारवाईत हिज्बुल्लाहच निम्म सैन्य इन्फ्रास्ट्रक्चर उद्धवस्त झालं आहे. इस्रायलने इथे सुद्धा गाजा पट्टीसारखीच रणनिती अवलंबली आहे. आधी हवाई हल्ले करुन इन्फ्रास्ट्रक्चर उद्धवस्त करायचं. मग जमिनीवरील सैन्य कारवाई करायची. हिज्बुल्लाहच्या टॉप लीडरशिपमध्ये आता फक्त तीन लोक उरले आहेत असं IDF ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यात चीफ हसन नसरल्लाह, हिजबुल्लाहच्या दक्षिणी मार्चाचा कमांडर अली कराकी आणि बद्र युनिटचा हेड अबु अली. अन्य 18 जणांचा खात्मा झाला आहे.

हिज्बुल्लाहकडे किती लाख रॉकेट होते?

इस्रायलने हिज्बुल्लाहची निम्मी सैन्य शक्ती संपवली आहे. IDF नुसार, तीन दिवसांपूर्वी हिज्बुल्लाहकडे 1 लाख 40 हजार रॉकेट आणि मिसाइलचा साठा होता. पण इस्रायलच्या विनाशक हल्ल्यात हिज्बुल्लाहचा निम्मा रॉकेट आणि मिसाइल साठा नष्ट झाला आहे. म्हणजे 70 हजार रॉकेट, मिसाइल जळून खाक झाली आहेत. IDF च्या दाव्यानुसार, हिज्बुल्लाहची 50 टक्के शस्त्र, 50 टक्के रॉकेट लॉन्च पॅड आणि 60 टक्के तळ ढिगाऱ्यामध्ये बदलले आहेत.

‘तर तुमची घर उद्धवस्त होणार हे निश्चित’

लेबनानमध्ये इस्रायल आता कारवाईचा पुढचा टप्पा सुरु करणार आहे. इस्रायली सैन्य यासाठीच आता दक्षिण लेबनान रिकामी करण्याच्या मागे लागलं आहे. IDF ने पत्रक टाकून लोकांना लवकरात लवकर दक्षिण लेबनान सोडण्याच आवाहन केलं आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनानच्या लोकांना अंतिम इशारा दिला आहे. “लेबनानी जनतेने हिज्बुल्लाहच्या दहशतवाद्यांना आपल्या घरात मिसाइल आणि दारुगोळा ठेवायची परवानगी दिली, तर त्यांची घर उद्धवस्त होणार हे निश्चित”