
पाकिस्तानची अतिरेकी संघटना जैश-ए-मोहम्मदने आता नवीन चाल खेळली आहे. या अतिरेकी संघटनेने एक महिला जिहादी ब्रिगेडची स्थापना केली आहे.तिचे नाव जमात अल-मोमिनात ठेवले आहे. या संघटनेत महिलांची भर्ती करण्यासाठी ऑनलाईन जिहादी कोर्स तुफत अल-मुमिनात सुरु केला आहे. मसूद अझहर याच्या बहिणी आणि उमर फारुकची पत्नी याचे नेतृत्व करणार आहे. प्रत्येक सहभागी महिलेकडून आता ५०० पाकिस्तानी रुपये डोनेशन घेतले जात आहे.
या महिन्याच्या सुरुवातीलाच उघड झाले होते की संयुक्त राष्ट्राने बंदी घातलेल्या मसूद अझहरची संघटना जैश-ए- मोहम्मद एक महिला ब्रिगेड तयार करत आहे.पाकिस्तानचे समर्थन प्राप्त ही संघटना आता महिलांसाठी खास जमात उल-मुमिनात नावाची विंग तयार करत आहे. हा गट महिलांची भर्ती आणि फंड जमा करण्यासाठी एक ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स चालवत आहे. या कोर्सचे नाव तुफत अल-मुमिनात ठेवले आहे.
मौलाना मसूद अझहर या महिला ब्रिगेडचे नेतृत्व त्याची छोटी बहिण सादिया अझहर कडे सोपवले आहे.सादियाचा पती युनूस अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झाला होता. उमर फारुक पुलवामा अतिरेकी हल्ल्यात सामील होता. नंतर सुरक्षा दलाच्या बरोबर झालेल्या तो ठार झाला होता.
संघटनेला मजबूत करणे आणि अधिक महिलांना आपल्या महिला ब्रिगेडमध्ये सामील करण्याच्या उद्देश्याने हा कोर्स तयार केला आहे. त्यात जैश-ए-मोहम्मदचे नेत्यांच्या कुटुंबियातील सदस्य मसूद अझहर आणि त्याच्या कमांडरचे नातेवाईक सामील आहेत. महिलांना जिहाद, धर्म आणि इस्लामच्या नुसार त्यांच्या जबाबदाऱ्या शिकवल्या जाणार आहेत.
8 नोव्हेंबर पासून ऑनलाईन लेक्चरद्वारे भरती अभियान राबवण्याची योजना आहे. रोज 40 मिनिटांच्या ऑनलाईन सत्रात मसूद अझहरच्या दोन्ही बहिणी सादिया अझहर आणि समैरा अझहर महिलांना जैशची महिला ब्रिगेड जमात उल-मुमिनातमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहन देणार आहेत.
मसूद अझहर दान जमा करण्याची कोणतीही संधी सोडत नाही.त्याने 27 सप्टेंबर रोजी बहावलपुरच्या मार्कज उस्मान ओ अलीमध्ये दिलेल्या भाषणात दान करण्याचे आवाहन केले होते. आता जैश-ए-मोहम्मदच्या या कोर्समध्ये नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक महिलेकडून 500 पाकिस्तानी रुपयांचे दान स्वीकारले जाणार आहे. तसेच त्यांच्याकडून एक ऑनलाईन माहिती फॉर्म देखील भरुन घेतला जात आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी अतिरेकी संघटना बिथरल्या आहेत. जैश-ए-मोहम्मद, लष्कर -ए-तैयबा आणि हिजबुल रॅलीद्वारे जिहादींची भरती करत आहे. जैशच्या अशाच एका रॅलीची तयारी करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ही रॅली मुजफ्फराबाद येथे आयोजित केलेली आहे.व्हिडीओत स्टेज सजवताना आणि भित्तीवर पोस्टर चिकटवताना लोक दिसत आहेत.
या पोस्टरमध्ये ऑपरेशन सिंदूर नंतर जैशच्या हेड क्वॉर्टर मरकज सुबहान अल्लाह मस्जिदवर झालेल्या हल्ल्यात ठार झालेल्या अतिरेक्यांना शहीद म्हटले आहे. प्रत्येक भिंतीवर जिहादचे पोस्टर लावले जात आहेत. ही रॅली खास करुन जैशमध्ये महिलांच्या भरतीसाठी आयोजित केलेली आहे.जेथे त्यांना जिहादी बनवण्यासाठी त्यांचे ब्रेन वॉश केले जात आहे.तसेच जिहादच्या नावाने त्यांच्याकडून निधीही घेतला जात आहे.
8 ऑक्टोबर रोजी मसूद अझहर याने जैश-ए-मोहम्मदच्या महिला ब्रिगेड जमात उल-मुमिनातची घोषणा केली होती. आणि 19 ऑक्टोबर रोजी रावळकोट ( पीओके ) मध्ये दुख्तरान-ए-इस्लाम नावाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानात महिलांना एकट्याने बाहेर पाठवले जात नाही, त्यामुळे जैशने महिलांच्या भरतीसाठी ऑनलाईन कोर्स सुरु केला आहे.त्यामुळे पुरुषांच्या अतिरेकी ब्रिगेडसह ISIS, हमास आणि LTTE सारख्या संघटनाच्या धर्तीवर महिलांची अतिरेकी ब्रिगेड तयार करुन त्याचा आत्मघाती हल्ल्यासाठी वापर करण्याची जैशची योजना आहे.