PM मोदींनी आठवडाभरापूर्वी घेतली होती भेट, आता ‘या’ देशाच्या पंतप्रधानांनी दिला राजीनामा, कारण काय?

जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी राजीनामा दिला आहे. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये (एलडीपी) फूट पडू नये म्हणून त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

PM मोदींनी आठवडाभरापूर्वी घेतली होती भेट, आता या देशाच्या पंतप्रधानांनी दिला राजीनामा, कारण काय?
japan pm Resign
| Updated on: Sep 07, 2025 | 5:24 PM

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवडाभरापूर्वी जपानच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी पंतप्रधानांनी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांनी भारत आणि जपानमधील विविध करारांवर सही केली होती. अशातच आता जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी राजीनामा दिला आहे. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये (एलडीपी) फूट पडू नये म्हणून त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत एलडीपीचा दारुण पराभव झाला होता. 248 जागा असलेल्या वरिष्ठ सभागृहात एलडीपीला बहुमत मिळवता आले नाही. त्यामुळे पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर एका वर्षानंतर इशिबा यांनी राजीनामा दिला आहे. जुलैपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मात्र आता त्यांनी पद सोडले आहे.

एलडीपी नवीन नेता निवडणार

लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आता नवीन नेता निवडणार आहे. इशिबा यांच्या राजीनाम्यानंतर नवीन नेत्याची निवड होईपर्यंत जपानमध्ये राजकीय अस्थिरता असणार आहे. एलडीपीचे अनेक खासदार स्वतःला पुढील पंतप्रधान म्हणून आपला दावा करण्याता प्रयत्न करत आहेत. मात्र कोणत्याही खासदाराला उमेदवारीसाठी किमान 20 इतर खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो.

संसदेतही पाठिंबा गरजेचा

एखाद्या खासदाराची पक्षनेता म्हणून निवड झाल्यानंतर त्या उमेदवाराला पंतप्रधान होण्यासाठी संसदेतही पाठिंबा आवश्यक असणार आहे. एलडीपीच्या नेतृत्वाखालील युतीने बहुमत गमावले आहे, मात्र कनिष्ठ सभागृहात अजूनही त्यांच्याकडे सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराचा विजय होऊ शकतो. मात्र विजयाची हमी देता येत नाही. त्यामुळे जो खासदार पक्षनेता बनेल त्याला विरोधी किंवा अपक्ष खासदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये इशिबा यांनी पदभार स्वीकारला होता, तेव्हाही पक्षाकडे बहुमत नव्हते. 1955 मध्ये पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच एलडीपीला युती सरकार स्थापन करावे लागले होते.

पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ही नावे आघाडीवर

एलडीपी पक्षाकडून पंतप्रधान पदासाठी अनेक नावे आघाडीवर आहेत. यात माजी गृहमंत्री साने ताकायची, कृषीमंत्री शिंजिरो कोइझुमी आणि माजी आर्थिक सुरक्षा मंत्री ताकायकी कोबायाशी यांचा समावेश आहे. तसेच सध्याचे मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी आणि अर्थमंत्री कात्सुनोबू काटो यांची नावेही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत.