लाहोरमध्ये तब्बल 25 वर्षांनंतर पतंग उडवायला परवानगी, का घालण्यात आली होती बंदी?

तब्बल 25 वर्षांनंतर पतंग उडवायला परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र जरी पतंग उडवायला परवानगी देण्यात आली असली तरी त्यासाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत.

लाहोरमध्ये तब्बल 25 वर्षांनंतर पतंग उडवायला परवानगी, का घालण्यात आली होती बंदी?
पाकिस्तानात पतंग उडवायला परवानगी
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Dec 03, 2025 | 10:10 PM

तब्बल अडीच दशकांनंतर म्हणजे 25 वर्षानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये पतंग उडवण्याची परवानगी देण्यात आली आहे. वसंत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारकडून पतंग उडवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र जरी पतंग उडवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी देखील त्यासाठी अनेक जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आता पाकिस्तानच्या पंजाबमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे, यावर्षी पतंग उडवला जाणार असून, त्या माध्यमातून आपली पारंपरिक संस्कृती जोपासली जाणार असल्यानं येथील नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान दिसत आहे. पंजाबचे गव्हर्नर सरदार सलीम हैदर यांनी या आदेशावर सही केली आहे. त्यामुळे आता तब्बल 25 वर्षानंतर येथील नागरिक पतंग उडवण्याचा आनंद घेणार आहेत.

काय आहेत नियम?

सरकारने पंजाब प्रांतामधील नागरिकांना वसंत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवण्याची परवानगी तर दिली आहेत, मात्र त्याचबरोबर काही नियम देखील लागू करण्यात आले आहेत. सरकारने घालून दिलेले नियम आणि नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन आता पाकिस्तानच्या पंजाबमध्ये पतंग उडवण्यात येणार आहे. जर कोणी पतंग उडवताना नियमांचं उल्लंघन केलं अशा व्यक्तीला कमीत कमी तीन वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, तसेच दोन लाखांच्या दंडाची देखील तरतूद करण्यात आली आहे.

पतंगासाठी जो मांजा वापरला जातो, त्यामध्ये अनेकदा काच मिक्स केली जाते, या मांजामुळे अनेक अपघात होतात, अनेकांचे बळी जातात त्यामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये पतंग उडवण्यासाठी बंदी घालण्यात आली होती, मात्र आता ही बंदी उठवण्यात आली आहे, यासाठी पाकिस्तान सरकारकडून बनवण्यात आलेला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे कोणीही नायलॉनच्या मांजाचा वापर करणार नाही, पतंग उडवण्यासाठी साध्या मांजाचाच वापर करायचा, तसेच ज्यांचं वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा लोकांना पतंग उडवण्यास बंदी अजूनही कायम आहे, जर अल्पवयीन मुलं पतंग उडवताना दिसले, तर त्यांच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येणार आहे. या सर्व गोष्टींवर तेथील सरकारचं बारीक लक्ष असणार आहे.