Israel-Iran Tension : टेन्शन वाढलं, इस्रायलच्या उत्तर सीमेवर ड्रोन, रॉकेटद्वारे मोठा हल्ला

| Updated on: Apr 13, 2024 | 8:41 AM

Israel-Iran Tension : युद्धाला तोंड फुटण्याआधी इस्रायलच्या उत्तर सीमेवर मोठा हल्ला झाला आहे. ड्रोन, रॉकेटद्वारे हा हल्ला करण्यात आला. जगातील अनेक देशांनी या दोन देशातील प्रवास टाळण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेसाठी खाडी देशांनी एक नवीन अडचण निर्माण केली आहे. या दरम्यान अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतलाय.

Israel-Iran Tension : टेन्शन वाढलं, इस्रायलच्या उत्तर सीमेवर ड्रोन, रॉकेटद्वारे मोठा हल्ला
Rocket Drone Attack on Israel
Follow us on

काही दिवसांपूर्वी इस्रायलने सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये इराणी दूतावासावर हवाई हल्ला केला. इस्रायलने कधीही जाहीरपणे या हल्ल्याची कबुली दिलेली नाही. पण यामागे इस्रायलच असल्याचा दावा आहे. या घटनेनंतर इराणने इस्रायलला धडा शिकवणार असल्याच जाहीर केलं आहे. इराणकडून इस्रायलवर हल्ला होऊ शकतो. म्हणून जगातील अनेक देशांनी या दोन देशातील प्रवास टाळण्याचा इशारा दिला आहे. इराण आणि इस्रायलमध्ये तणाव वाढत चालला आहे. युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. इराण लवकरच इस्रायलच्या अनेक ठिकाणांवर हल्ला करु शकतो, असा अमेरिकेने दावा केला आहे. या दरम्यान लेबनानने इस्रायलवर हल्ला केल्याची बातमी आहे. लेबनानने उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ला केला आहे. याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हवेतच हे रॉकेट नष्ट केले.

इस्रायल डिफेन्स फोर्सने या हल्ल्या संदर्भात माहिती दिली आहे. “रॉकेट हल्ल्याच्या काहीवेळ आधी उत्तर इस्रायलयमध्ये अलर्ट सायरन वाजवण्यात आले होते. त्यानंतर हा हल्ला झाला. IDF ने सांगितलं की, लेबनानच्या क्षेत्रातून येणाऱ्या 40 रॉकेट्सची ओळख पटवून ती हवेतच नष्ट करण्यात आली. काही रॉकेट्स मोकळ्या जागेत पडली. अजूनपर्यंत कोणाचाही मृत्यू किंवा जखमी झाल्याची सूचना मिळालेली नाही”

इस्रायल डिफेन्स फोर्सने अजून काय माहिती दिली?

एरियल डिफेन्स सिस्टिम म्हणजे हवाई सुरक्षा कवचाने याआधी सुद्धा लेबनानकडून येणाऱ्या स्फोटकांनी भरलेल्या दोन यूएवीना यशस्वीरित्या नष्ट केलं होतं, IDF ने ही माहिती दिली. लेबनानमधून रामोत नफ़्तालीच्या दिशेने हे रॉकेट्स डागण्यात आले होते. आयडीएफने दक्षिण लेबनानमधील अनेक स्थानांवर हल्ला केला आहे. फक्त मिसाइलच नाही, तर आयडीएफने लेबनानमधून इस्रायलच्या हवाई क्षेत्रात घुसलेले दोन ड्रोनही नष्ट केले. हे दोन्ही हिजबुल्लाहचे स्फोटक ड्रोन होते.

अमेरिकेचा मोठा निर्णय

लेबनानच्या रॉकेट हल्ल्यानंतर अमेरिका सर्तक झाली आहे. इराणकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिका मध्य पूर्वेमध्ये अतिरिक्त सैन्य पाठवणार आहे. पण अमेरिकेसाठी खाडी देशांनी एक नवीन अडचण निर्माण केली आहे. इराणवर हल्ल्यासाठी आम्ही आमच्या सैन्य तळांचा तुम्हाला वापर करु देणार नाही, असा कुवेत आणि कतारने अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिकेचा खाडी देशात मोठा सैन्य तळ आहे, जिथे जवळपास 40 हजार सैनिक आहेत.