
ब्रिटनमध्ये शनिवारी संध्याकाळी (१ नोव्हेंबर) लंडनला जाणाऱ्या ट्रेनमध्ये धक्कादायक घटना घडली. ट्रेनमध्ये एका व्यक्तीने अनेक प्रवाशांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये १० जण जखमी झाले. त्यापैकी ९ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन संशयितांना अटक केली आहे. ही घटना संध्याकाळी साधारण ७.३० वाजता पीटरबरो स्टेशनहून ट्रेन निघाल्यानंतर काही मिनिटांनंतर घडली. ही ट्रेन डॉनकास्टरहून लंडनच्या किंग्स क्रॉस स्टेशनकडे जात होती, जी नेहमी प्रवाशांनी गजबजलेली असते.
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले?
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्यांनी एका व्यक्तीला मोठा चाकू हातात घेऊन पाहिले आणि चारही बाजूंना रक्त सांडलेले होते. एका प्रवाशाने सांगितले की, लोक आपला जीव वाचवण्यासाठी बाथरूममध्ये लपले. गोंधळ उडाल्यामुळे अनेक जण खाली कोसळले आणि त्यांवरुन अनेकजण गेले. एका साक्षीदाराने The Timesला सांगितले की, “लोक ओरडत होते, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो.. कदाचित ते कोणाला तरी शांत करण्याचा प्रयत्न करत होते.” दुसऱ्या साक्षीदाराने Sky Newsला सांगितले की, त्यांनी एका जखमीला धावताना म्हणताना ऐकले, “त्यांच्याकडे चाकू आहे, त्यांनी मला मारले आहे.” BBCशी बोलताना तिसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले, “सुरुवातीला मला वाटले कोणीतरी मजा करत आहे, पण नंतर लोक ओरडू लागले ‘पळा, पळा, तो सर्वांना चाकूने मारत आहे.’”
ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी सांगितले हे
ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या तपासात काउंटर टेररिझम पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. जेणेकरून हल्ल्याचे पूर्ण कारण आणि पार्श्वभूमी समजेल. पोलीस अधिकारी क्रिस केसी यांनी सांगितले की, तपास सुरू आहे आणि निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल.
पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी दिली प्रतिक्रिया
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी या हल्ल्याला अत्यंत भयावह म्हटले आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. त्यांनी लोकांना पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.