Nobel Peace Prize 2025 : ट्रम्प यांच्या स्वप्नांवर पाणी फेरणाऱ्या Maria Corina Machado आहेत तरी कोण ? का मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार ?

अख्ख्या जगाचं लक्ष लागलेल्या शांततेचा नोबेल पुरस्काराची घोषणा अखेर झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अपेक्षांवर पाणी पडलं असून यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा Maria Corina Machado यांना जाहीर झाला आहे, कोण आहे त्या, जाणून घेऊया..

Nobel Peace Prize 2025 : ट्रम्प यांच्या स्वप्नांवर पाणी फेरणाऱ्या Maria Corina Machado आहेत तरी कोण ? का मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार  ?
मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल जाहीर, ट्रम्प यांच्या स्वप्नांवर पाणी
Image Credit source: social media
| Updated on: Oct 10, 2025 | 3:29 PM

Nobel Peace Prize 2025 : संपूर्ण जगाचं विशेषत: अमेरिकेचं लक्ष लागलेल्या 2025 सालच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराची अखेर घोषणा झाली आहे. यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा व्हेनेझुएलाच्या प्रमुख विरोधी नेत्या आणि औद्योगिक अभियंता मारिया कोरिना मचाडो ( Maria Corina Machado) यांना जाहीर झाला आहे. लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी, देशातील हुकूमशाहीविरुद्ध लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि न्याय्य आणि शांततापूर्ण कारणांसाठी लढण्यासाठी मचाडो यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. शांततेच्या नोबेलासाठी जंग जंग पछाडणाऱ्या, अनेक देशांमध्ये शांतता प्रस्थापित केल्याचा दावा करणाऱ्या, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मात्र यामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सर्व मनसुबे धुळीला मिळालेत, अपेक्षांवर अक्षरश: पाणी पडलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासू ट्रम्प हे नोबेलच्या शर्यतीत आपला दावा मांडत होते. अखेर आज नोबेल शांती पुरस्कारासाठी मारिया कोरिना मचाडो यांच्या नावाची घोषणा झाली.

मारिया कोरिना मचाडो यांना का मिळाला पुरस्कार ?

शांततेचा नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांना कठीण परिस्थितीत लपून बसावे लागले होते, मात्र तरीही त्यांनी हार न मानता, या संपूर्ण काळात आपला संघर्ष सुरू ठेवला. नोबेल समितीने म्हटले की, ” त्यांच्या जीवाला गंभीर धोका असूनही, त्या देशातच राहिल्या.” नोबेल समितीने मचाडोच्या शौर्याचे कौतुक केले आणि म्हटले की ” जेव्हा हुकूमशाही शक्ती सत्ता काबीज करतात तेव्हा उभे राहून प्रतिकार करणाऱ्या स्वातंत्र्याच्या धाडसी रक्षकांना ओळखणे महत्त्वाचे असते”.  ” लोकशाही अशा लोकांवर अवलंबून आहे जे गप्प राहण्यास नकार देतात, जे गंभीर धोके असूनही पुढे येण्याचे धाडस करतात. आणि स्वातंत्र्य कधीही कमी लेखू नये, ते नेहमीच शब्दांनी, धैर्याने आणि दृढनिश्चयाने वाचवले पाहिजे, याची आपल्याला आठवण करून देतात. “असे समितीने नमूद केलं.


कोण आहेत मारिया कोरिना मचाडो ?

मारिया कोरिना मचाडो यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1967 साली झाला. त्या व्हेनेझुएलातील एक प्रमुख विरोधी पक्षनेत्या आणि औद्योगिक अभियंता आहेत. 2002 साली त्यांनी सुमाते या मतदान देखरेख गटाची स्थापना केली आणि त्या व्हेंटे व्हेनेझुएला पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक आहेत. 2011 ते 2014 सालापर्यंत त्यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय सभेची सदस्य म्हणून काम केले. 2018 साली बीबीसीच्या 100 सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये आणि 2025 मध्ये टाइम मासिकाच्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता. निकोलस मादुरो सरकारने त्यांना देश सोडण्यास बंदी घातली होती. 2023 मध्ये अपात्र ठरल्यानंतरही, त्यांनी 2024 च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षाची प्राथमिक निवडणूक जिंकली, परंतु नंतर त्यांची जागा कोरिना योरिस यांनी घेतली.