‘Megaquake’ चा जपानला प्रचंड धोका, 3 लाख नागरिकांच जीव धोक्यात ?
Japan megaquake Warning : जपानमधील नानकाई ट्रफमध्ये मोठ्या भूकंपाची शक्यता असल्याने सुमारे 3 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि 2 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. सरकारने आपत्ती निवारण योजना आखल्या आहेत.

भूकंपांसाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या जपानला आता पुन्हा एकदा मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. नानकाई ट्रफमध्ये ‘मेगाक्वेक’ येण्याची शक्यता असून यामुळे जपानी अधिकाऱ्यांना चिंतेत टाकत आहे. नवीन अंदाजानुसार, अशा भूकंपामुळे सुमारे 3 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो आणि 2 ट्रिलियन डॉलर्स (सुमारे 167 लाख कोटी रुपये) चे नुकसान होऊ शकते. हे नुकसान 2011 च्या तोहोकू भूकंप आणि त्सुनामीपेक्षाही जास्त असू शकते.
नानकाई ट्रफ हा जपानच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील 500 मैल लांबीचा सागरी खंदक आहे. येथे फिलीपिन्स सागरी प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली सरकत आहे, ज्यामुळे मोठे भूकंप होऊ शकतात.
इतिहासाकडे नजर टाकली तर या प्रदेशात दर 100-200 वर्षांनी एक मोठा भूकंप झाला आहे. असा शेवटचा भूकंप 1946 साली झाला होता. जानेवारीमध्ये, जपानी सरकारी समितीने पुढील 30 वर्षांत 8 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप होण्याची शक्यता 75 ते 82 % असल्याचा अंदाज वर्तवला होता. यामुळे 2 लाख 98 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो आणि 2.35 दशलक्ष इमारती उद्ध्वस्त होऊ शकतात असे मार्चमधील एका अहवालात म्हटले होते.
किती वेळ शिल्लक ?
जर मोठा भूकंप झाला तर काही भागात तयारीसाठी फक्त दोन मिनिटे असतील. जपान हवामानशास्त्र संस्थेने (जेएमए) इशारा दिला आहे की 10 मीटर उंचीच्या त्सुनामीच्या लाटा टोकियो आणि इतर 12 किनारी प्रीफेक्चर्सना धडकू शकतात. या अंदाजानुसार, या आपत्तीत 2 लाख 15 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो. इमारती कोसळल्याने 73 हजार लोकांचा जीव जाऊ शकतो आणि आगीमुळे सुमारे 8 हजार 700 लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते.
जपानची तयारी काय ?
2014 मध्ये, जपानच्या केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन परिषदेने राष्ट्रीय आपत्ती निवारण योजना तयार केली. त्यावेळी असा अंदाज होता की भूकंपामुळे 3 लाख 32 हजार लोक मृत्युमुखी पडू शकतात आणि 25 लाख इमारती उद्ध्वस्त होऊ शकतात. त्यानंतर सरकारने 10 वर्षांत मृत्यू 80% आणि इमारतींचे नुकसान 50% कमी करण्याचे लक्ष्य ठेवले. परंतु हे लक्ष्य पूर्ण झाले नाही अशी कबुली एका कॅबिनेट अधिकाऱ्याने दिली, सध्याच्या उपाययोजनांमुळे मृत्यू फक्त 20 % कमी होऊ शकतात.
1 जुलै रोजी झालेल्या बैठकीत, सरकारने तरीही जुने लक्ष्य कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. “राष्ट्र, नगरपालिका, कंपन्या आणि ना-नफा संस्थांनी एकत्र येऊन शक्य तितके जीव वाचवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत ” असे पंतप्रधान शिगेरू इशिबा म्हणाले.
काय आहे नवी योजना ?
जपान सरकारने आता तटबंदी आणि त्सुनामी-प्रतिरोधक निर्वासन इमारती जलद गतीने बांधण्यासाठी अनेक योजनांची शिफारस केली आहे. तटबंदी आणि त्सुनामी-प्रतिरोधक निर्वासन इमारती जलदगतीने बांधल्या पाहिजेत. याशिवाय, देशभरात नियमितपणे आपत्कालीन सराव आयोजित केले पाहिजेत आणि आवश्यक वस्तूंच्या साठवणुकीची व्यवस्था केली पाहिजे. याशिवाय, भूकंप टाळण्यासाठी पायाभूत सुविधा तयार केल्या पाहिजेत.
जपानमधील 30 प्रीफेक्चरमधील 723 नगरपालिकांना “आपत्ती तयारी क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात आले आहे, जे इबाराकी ते ओकिनावा पर्यंत पसरलेले आहे. हे क्षेत्र 6 किंवा त्याहून अधिक तीव्रतेच्या भूकंपाचा आणि 3 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या ध्वनी लाटांचा परिणाम होऊ शकतात. स्थानिक सरकारांना आता नवीन आपत्ती प्रतिबंधक योजना तयार करण्यास सांगण्यात आले आहे. रुग्णालये आणि मोठ्या सार्वजनिक इमारतींसाठी स्थलांतर प्रक्रिया सुनिश्चित कराव्या लागतील. याशिवाय, प्रादेशिक असुरक्षिततेवर आधारित केंद्र सरकारच्या सहकार्याने योजना तयार कराव्या लागतील.
