
अमेरिका आणि इस्रायलने तेहरानवर संयुक्त हल्ले केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले. इराणने प्रत्युत्तर म्हणून केलेल्या हल्ल्यांमध्ये संयुक्त अरब अमिरातीवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ले केले. दुबईतील पाम जुमेराह या हॉटेलला आग लागली, त्यात किमान चार जण जखमी झाले. दुबईतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, जगातील सर्वांत उंच इमारत असलेली बुर्ज खलिफा ही इमारत रिकामी करण्यात आली. इराणने संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबी तसंच दुबई आणि कतारमधील दोहा, सौदी अरेबियामधील रियाध इथल्या ठिकाणांना लक्ष्य केलं. दुबईत मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि आकाशात क्षेपणास्त्रे फिरताना दिसली, अशी माहिती तिथल्या रहिवाशांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दुबईतील बुर्ज खलिफा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. या इमारतीच्या 124, 125 आणि 148 व्या मजल्यावरून दुबई शहर आणि अरबी आखाताचं नयनरम्य दृश्य दिसतं. आयुष्यात एकदा तरी दुबईला फिरायला जावं आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी बुर्ज खलिफा ही इमारत पहावी, अशी अनेकांची इच्छा असते. 163 मजल्यांचा बुर्ज खलिफा हा आयफेल टॉवरपेक्षाही तिप्पट उंच आहे. त्यात 58 लिफ्ट, 304 हॉटेल रुम्स, 900 लक्झरी अपार्टमेंट्स आहेत. दुबईच्या एका रिअल इस्टेट वेबसाइटनुसार, बुर्ज खलिफामधील फ्लॅटची किंमत 3.73 कोटी रुपयांपासून 14 कोटी रुपयांपर्यंत आहे. यात 1 BHK ची किंमत 3.73 कोटी रुपये, 2 BHK ची किंमत 5.83 कोटी रुपये आणि 3 BHK ची किंमत 14 कोटी रुपये आहे. बुर्ज खलिफामध्ये तब्बल 21000 स्क्वेअर फूटचा पेंटहाऊससुद्धा आहे, ज्याची किंमत अंदाजे 240 कोटी रुपये इतकी आहे.
बुर्ज खलिफाच्या बांधकामासाठी अंदाजे 1.4 ते 1.5 अब्ज डॉलर्सचा खर्च आला होता. 2025 मध्ये त्याच्या पुनर्बांधणीचा अंदाजे खर्च हा 2.8 ते 3.5 अब्ज डॉलर्सदरम्यान होता. दरम्यान इराणने संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कतार, कुवेत आणि जॉर्डन या देशांवर केलेल्या हल्ल्यांचा सौदी अरेबियाने निषेध केला. हा हल्ला त्या देशांच्या सार्वभौमत्वावर असल्याचं सौदीने म्हटलंय.
इराणने अण्वस्त्र विकास कार्यक्रम गुंडाळावा याबाबद अमेरिका आणि इस्रायलकडून सातत्याने दबाव होता. इराण युरेनियम समुद्धीकरणाची पातळी अणुऊर्जा कार्यक्रमापुरती मर्यादित ठेवण्यास राजी झाला होता. मात्र क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमही आवरता घ्यावा ही अमेरिकेची मागणी इराणला मंजूर नव्हती. यासंबंधी ओमानमध्ये वाटाघाटी सुरू होत्या. त्यांच्या समाप्तीआधीच अमेरिका आणि इस्रायलने हल्ले सुरू केले.