भारताच्या शत्रूसोबत रशियाचा करार? मास्कोने पाकिस्तानी माध्यमांच्या दाव्यातील सत्य आणले समोर

रशियाने पाकिस्तासोबत मोठा आर्थिक करार केला असल्याच्या बातम्या आल्या. आता रशियाकडून या बातम्याचे सत्य समोर आणले आहे. या बातम्या म्हणजे सनसनाटी निर्माण करण्याचा पाकिस्तान माध्यमांचा प्रयत्न असल्याचे रशियाने म्हटले आहे.

भारताच्या शत्रूसोबत रशियाचा करार? मास्कोने पाकिस्तानी माध्यमांच्या दाव्यातील सत्य आणले समोर
vladimir putin and shahbaz sharif
| Updated on: May 31, 2025 | 9:58 AM

Vladimir Putin and Shahbaz Sharif: भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव असताना रशियाने पाकिस्तासोबत मोठा आर्थिक करार केला, या पद्धतीच्या बातम्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी माध्यमातून आल्या होत्या. रशियाने पाकिस्तानी माध्यमांचा हा दावा फेटाळला आहे. रशिया आणि पाकिस्तान यांच्यासोबतच्या कराराची बातमी केवळ अफवा असल्याचे रशियाने म्हटले आहे. भारत आणि रशियाचे संबंध पटरीवरुन उतरवण्याचा हा प्रयत्न आहे, असेही रशियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पाकिस्तानमधील मीडिया आउटलेटने दावा केला होता की, रशियाने पाकिस्तानसोबत स्टील प्लँट पुन्हा सुरु करण्यासाठी करार केला आहे. १९७० मध्ये सोव्हियत संघासोबत पाकिस्तान स्टील मिल्ससोबत डिझाइन केलेला हा प्लँट आहे. तो प्लँट सुरु करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे विशेष सहायक हारुन अख्तर खान आणि मास्कोचे प्रतिनिधी डेनिस नजरूफ यांच्या दरम्यान १३ मे रोजी इस्लामाबादमध्ये बैठक झाली होती. त्यावेळी हा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला.

रशियाने फेटाळला दावा

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले की, रशिया आणि पाकिस्तान दरम्यान २.६ अब्ज डॉलरचा करारावर स्वाक्षरी झाली. परंतु रशियाने पाकिस्तानी माध्यमांमध्ये आलेला हा दावा फेटाळला आहे. या पद्धतीच्या कोणताही करार झाला नाही. भारत-रशिया दरम्यान असलेल्या दृढ संबंधांना नुकसान पोहचवण्यासाठी या बातम्या पेरल्या गेल्या आहेत. परंतु हा अयशस्वी प्रयत्न आहे. भारत आणि रशियाचे संबंध ऑपरेशन सिंदूरनंतर अधिक घट्ट झाले आहेत, असे रशियाने म्हटले आहे.

एआयआर न्यूजने एका वरिष्ठ रशियन अधिकाऱ्याचा संदर्भ देत म्हटले की, पाकिस्तान माध्यमांमध्ये आलेली ही बातमी अतिशयोक्तीपूर्ण आहे. सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. रशियन मीडिया आउटलेट स्पुतनिक इंडियाकडूनही या कराराच्या बातमीचे वृत्त फेटाळले आहे. स्पुतनिक इंडियाने म्हटले आहे की, रशिया आणि पाकिस्तानमधील २.६ अब्ज डॉलर्सच्या कराराच्या वृत्तास विश्वासार्ह स्रोत नाही. रशिया आणि पाकिस्तानमध्ये चर्चा झाली होती, परंतु अब्जावधी डॉलर्सचा करार झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.