
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. रशियाकडून वारंवार नाटो देशांना आव्हान देण्याचा प्रयत्न होत आहे. रशियानं आपली लढाऊ विमानं पोलंडच्या हवाई क्षेत्रामध्ये घुसवली होती, त्यानंतर नाटो देश आणि रशियामधील तणाव वाढला आहे. दुसरीकडे रशियानं युक्रेनसोबत युद्ध थांबवावं यासाठी रशियावर अमेरिकेकडून दबाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे रशिया आणि अमेरिकेमधील संबंध देखील ताणले गेले आहेत. त्यातच आता ट्रम्प यांनी असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे पु्न्हा एकदा अमेरिका आणि रशिया आमने-सामने येण्याची चिन्ह आहेत.
नाटो देशांच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी करणारे रशियाची लढाऊ विमानं पाडून टाका असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेमध्ये युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी हे विधान केलं आहे. त्यानंतर एका पत्रकारानं देखील डोनाल्ड ट्रम्प यांना हाच प्रश्न विचारला की तुम्हाला वाटतं का, नाटो देशाच्या हवाई क्षेत्रामध्ये घुसखोरी करणाऱ्या रशियाची लढाऊ विमानं पाडली पाहिजेत म्हणून, त्यावर देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी हेच म्हटलं की, मला वाटतं ही विमान आता पाडली पाहिजेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आता यावर रशियाकडून काय प्रतिक्रिया येणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसरीकडे रशियावरील निर्बंध अधिक कडक करण्याबाबत देखील डोनाल्ड ट्रम्प विचार करत आहेत. त्यासाठी त्यांनी दोन आठवड्याचा वेळ देखील मागितला आहे. एकीकडे ते रशियावर निर्बंध लादण्याचा विचार करत आहेत, तर दुसरीकडे त्यांनी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांचं कौतुक केलं आहे. त्यामुळे ट्रम्प यांचं नेमकं काय सुरू आहे? यावरून जागतिक स्तरावर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
पोलंडच्या हवाई हद्दीमध्ये विमान घुसवल्यानंतर लगेचच रशियाला नाटो देशांकडून इशारा देण्यात आला होता, मात्र रशियानं या इशाऱ्यानंतर देखील आपली घुसखोरी सुरूच ठेवली आहे. रशियानं शुक्रवारी नाटोचा सदस्य असलेल्या एस्टोनिया देशाच्या हवाई हद्दीमध्ये आपली तीन लढाऊ विमान घुसवली होती, ही लढाऊ विमानं तब्बल बारा मिनिटं एस्टोनियाच्या हवाई क्षेत्रात होती, त्यामुळे आता नाटो देश आणि रशियामधील तणाव प्रचंड वाढला आहे.