Donald Trump : नाटो देशांचा डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का; अमेरिकेला वगळलं, आता पुढे काय?
नाटो देशांनी अमेरिकेला मोठा हादरा दिला आहे, डेन्मार्क, जर्मनी आणि फ्रान्सने घेतलेला हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या अनेक दिवसांपासून ग्रीनलँड आपल्या ताब्यात घेण्याचं स्वप्न पहात आहेत, मात्र आता त्यांना मोठा झटका बसला आहे. आता त्याच ग्रीनलँडमधून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे डेन्मार्क, फ्रान्स आणि जर्मनीने या भागात सैन्य कवायत सुरू केली आहे. विशेष म्हणजे डेन्मार्कने यावेळी अमेरिकेला या युद्ध अभ्यासामध्ये सहभागी केलेलं नाहीये. त्यामुळे हा डेन्मार्ककडून अमेरिकेला देण्यात आलेला स्पष्ट संदेश आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमेरिकेला या युद्ध अभ्यासामधून वगळण्यात आलं आहे.
यावर बोलताना डेन्मार्कचे आर्कटिक कमांडर सोरेन अँडरसन यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, आम्ही अमेरिकेचे सुरक्षा विभागाचे सचिव पीट हेगशेत यांना आमंत्रण दिलं होतं, मात्र त्यांच्या सैन्याला कोणत्याही प्रकारचं आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. म्हणजेच अमेरिकेला केवळ एक दर्शकाच्या भूमिकेत यावेळी डेन्मार्ककडून बोलावण्यात आलं होतं. मात्र यापूर्वी अमेरिकेला या युद्ध अभ्यासात सहभागी करून घेण्यात आलं होतं. अमेरिकेकडून देखील या वृत्ताची पुष्टी करण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वर्षांपूर्वी ग्रीनलँड खरेदी करण्याची इच्छा बोलून दाखवली होती, तेव्हापासून डेन्मार्क आणि अमेरिकेच्या संबंधामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आपण ग्रीनलँडला बळाच्या जोरावर देखील ताब्यात घेऊ शकतो असंही ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र डेन्मार्कसोबतचे संबंध आणखी खराब झाल्यामुळे ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यावरून युटर्न घेतला होता.
रशिया आणि चीन यांच्या जर आर्कटिक क्षेत्रामध्ये हालचाली वाढल्या तर त्याला उत्तर कसं द्यायचं यासाठी या सैन्य अभ्यासाचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेला आमंत्रण न देऊन डेन्मार्कने अमेरिकेला असा संदेश दिला आहे की, ग्रीनलँड हा आमचाच भाग असून, आम्ही तुमच्या मदतीशिवाय नाटो देशांच्या मदतीनं आमच्या भूभागाचं संरक्षण करू शकतो.
अमेरिकेला धक्का
दरम्यान हा आता अमेरिकेसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे, नाटो देशांचं नेतृत्व आपल्याकडे आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न अनेकदा अमेरिकेकडून होतो. मात्र आता ट्रम्प हे पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहेत.
