Nepal Earthquake: ज्याची भीती तेच घडलं… भूकंपाने नेपाळ हादरलं…रिश्टर स्केलवर तीव्रता किती?
Nepal Earthquake: भारताचा शेजारील देश नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे झटके बसले. गुरूवारी भल्या पहाटे भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. सप्टेंबर महिन्यातील नैसर्गिक संकटातून हा देश सावरलेला नसताना भूकंपनाने जमीन पुन्हा हादरली.

Nepal Earthquake: नेपाळवरील नैसर्गिक संकटाची मालिका अजूनही थांबलेली नाही. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात नेपाळमध्ये विनाशकारी महापूराने थैमान घातले होते. भूकंपानंतर हिमालयातील काही बर्फाची धरणं धोकादायक ठरली. त्यात अनेकांचा जीव गेला. या संकटातून अजूनही नेपाळ सावरलेला नसतानाच आज गुरूवारी, 12 नोव्हेंबर रोजी भल्या पहाटे नेपाळला भूकंपाने पुन्हा हादरा दिला. सकाळी 4:30 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.
लोकांमध्ये भीतीचे वातावरण
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, शेजारील देश नेपाळमध्ये गुरूवारी भल्या पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. संस्थेनुसार, हा भूकंप सकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी आला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.9 इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदु हा जमिनीच्या आत 73 किलोमीटर खोल होता.
सप्टेंबरमध्ये नेपाळला मोठा फटका
नेपाळ हा जगातील सर्वाधिक सक्रिय भूकंप प्रवण क्षेत्रापैकी एकात येतो. सप्टेंबर महिन्यात उत्तर आणि पश्चिमी नेपाळमध्ये सलग दोनदा मोठा भूकंप आणि त्या पाठोपाठ विनाशकारी महापूर आला. त्यात नेपाळचे मोठे नुकसान झाले. अनेक नागरिकांचा आणि पर्यटकांना जीव गमवावा लागला. पहिल्या भूकंपाची तीव्रता 4.5 होती आणि दुसऱ्यावेळी ही तीव्रता 4.2 इतकी मोजल्या गेली. या भूंकपाचा केंद्र बिंदू मुगू जिल्ह्यातील कलाई या भागात होता. भूकंपाचे झटके डोल्पा आणि जुम्ला या जिल्ह्यातही जाणवले. भूंकपामुळे नेपाळमध्ये गेल्या काही वर्षात नागरिकांना प्राण गमवावा लागला आहे.
लोकांची घराबाहेर धाव
नेपाळमध्ये भूंकपाचे जोरदार झटके बसले. भल्या पहाटेच भूकंपाचे धक्के जाणवल्यावर नागरिकांची भीतीने गाळण उडाली. अनेकांनी कुटुंबासह रस्त्यावर धाव घेतली. काहींनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. नदी काठच्या नागरिकांनी तातडीने डोंगराकडे धाव घेतली. यापूर्वी नेपाळमधील बैतडी जिल्ह्यात 26 ऑक्टोबर रोजी 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. बैतडी आणि दार्चुला जिल्ह्याच्या जवळपास भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपाचे केंद्रबिंदु भारत-नेपाळ सीमेवरील बैतडी जिल्ह्यात होते.
शिमल्यातही भूकंपाचे जाणवले धक्के
तर बुधवारी रात्री हिमाचल प्रदेशातील शिमला येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.9 इतकी होती. शिमलाच्या जवळपास जुब्बल आणि रोहरू या परिसरालाही भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपात कुठलीही जिवत हाणी झाल्याचे वृत्त आलेले नाही. धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. त्यानंतर नेपाळमध्ये आज सकाळी भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. यापूर्वी तिबेट सुद्धा भूकंपाने हादरले होते. त्याचे हादरे भारतातही जाणवले.