घर पडलंय… बहीण बेपत्ता… नेपाळमध्ये महाप्रलय कसा आला? संकट रोखता आलं असतं? वाचा Special Report

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या विनाशकारी महापुराने हाहा:कार उडाला. पाऊस नसतानाही डोंगरावरून ग्लेशियर कोसळल्याने नदीचा मार्ग अडला, तात्पुरता बांध फुटला आणि प्रचंड वेगाने पाणी गावात शिरले. यामध्ये अनेक जीव गेले, हजारो बेपत्ता झाले आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भविष्यात आणखी एका जलप्रलयाचा धोका अजूनही कायम आहे.

घर पडलंय... बहीण बेपत्ता... नेपाळमध्ये महाप्रलय कसा आला? संकट रोखता आलं असतं? वाचा Special Report
Nepal Flash Flood
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 27, 2026 | 3:36 PM

विध्वंस…. विनाशकारी… हे शब्दही अपुरे पडतील असा महाभयंकर प्रलय काल नेपाळमध्ये आला. नेपाळ-तिबेटच्या बॉर्डवरील नेपाळचा रसुवा जिल्ह्यावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. रसुवा परिसरातील भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे मोठा हाहा:कार उडाला. नेपाळमध्ये आलेल्या या विनाशकारी प्रलयाने 163 जीव घेतले. एक हजाराहून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे, पण शोध लागत नाहीये. या नैसर्गिक प्रलयामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. इतकंच नाही तर नेपाळचे 13 हायड्रोपॉवर प्रकल्पही नेस्तनाबूत झाले आहेत. पावसाचा एक टिपूसही पडलेला नसताना नेपाळमध्ये हा विनशाकारी प्रलय आला कसा? असा सवाल केला जात आहे. त्याचाच हा ग्राऊंड रिपोर्ट.

26 ऑगस्ट रोजी नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात सकाळी पाऊस झाला नाही. त्याच्या आदल्या रात्रीही पाऊस झाला नव्हता. तरीही सकाळी 9 वाजता भोटेकोशी नदीला अचानक पूर आला. हा पूर साधा नव्हता. महापूर होता. बघता बघता पुराचं पाणी घराघरात शिरायला सुरुवात झाली. या पाण्याच्या लोटासोबत दगड, माती आणि बर्फ सर्वच वाहून आलं. पाण्याचा वेग इतका होता की इमारती कोसळल्या, घरे कोलमडली, टॉवर आणि पूल वाहून गेले. माणसं, जनावरं पाण्याने पोटात घेतली. सर्वच उद्ध्वस्त झालं. काही स्थानिक या महाप्रलयातून वाचले आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर या घटना घडल्या. त्या सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबता थांबत नाहीये.

 

माझ्या डोळ्यासमोरच…

नुवाकोटमध्ये राहणाऱ्या कल्पना मल्ला हिने बीबीसीशी संवाद साधताना धक्कादायक माहिती दिली. माझ्या डोळ्यासमोरच माझ्या घरचे लोक वाहून गेले. माझे वडील, आई, बहीण, तिची मुलं सर्वजण पाण्यात वाहून गेले. ते लोक पुरातून वाचू शकले नाहीत. काहीच संधी मिळाली नाही. या पुराने सर्व काही हिरावून घेतलं. पण मी आणि माझा मुलगा घराच्या छतावर चढलो. त्यामुळे आम्ही वाचलो. आम्ही कसे वाचलो याचंच आम्हाला आश्चर्य वाटतंय, असं कल्पना म्हणाली.

कल्पनाचा मुलगा सुगम मल्ला म्हणाला, मी माझ्या आईचा हात जोराने धरून तिला वाचवलं. सर्वात आधी मी माझा फोन माझ्या बहिणीकडे दिला. ती सुरक्षित राहावी, संकटात मदतीसाठी तिने फोन करावा हा हेतू होता. आता तिच्याशीच संपर्क होत नाहीये. तिचा मोबाईल बंद आहे. तीही पुराच्या पाण्यात वाहून तर गेली नाही ना? याची मला भीती वाटतेय, असं सुगम म्हणाला.

 

गायी, म्हशीही वाहून गेल्या…

गोमा पंडीत या महिलेच्या डोळ्यातून अश्रू थांबता थांबत नाहीये. माझ्या म्हशी, गायी सर्वच वाहून गेल्या. माझी शेत जमीन वाहून गेली. मोहिरीच्या 10 गोण्या होत्या, त्याही वाहून गेल्या. अनेक टन मक्का आणि धान्य होतं. तेही वाहून गेलं. काहीच उरलं नाही, हे सांगताना गोमा हमसून हमसून रडत होती.

घर पडलंय, बहीण बेपत्ता आहे…

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यातील रसुवा स्याब्रु बेन्सी गावात राहणारा सोनम दोरजी हा परदेशी पर्यटकांसाठी ट्रेकिंगचं गाईड करतो. त्यानेही बीबीसीजवळ मनमोकळं केलं. सकाळी 9 वाजता गावात पूर आला. त्यापूर्वीच म्हणजे सकाळी 8 वाजताच मी काठमांडूला जायला निघालो होतो. म्हणून वाचलो. माझी बहीण डेचन तामांग अजून बेपत्ता आहे. तिचा नवरा आणि तिच्या कुटुंबातील सदस्यही गायब आहेत. मी गावातून निघालो तेव्हा पूर आल्याचं माझ्या कानी आलं होतं. भूकंप आला की काय अशी स्थिती होती. माझं घर पडलं. मी त्याचा फोटो पाहिला. पूर अचानक आला आणि सर्वच नेस्तनाबूत करून गेला, असं सोनमने सांगितलं.

सकाळी 8.37 वाजता…

बुधवारी सकाळी 8.37 वाजता नेपाळ-चीनच्या सीमेवर काठमांडूच्या उत्तरेकडे भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. सुरुवातीला अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे म्हणजे यूएसजीएसने या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 सेल्सिअस इतकी असल्याचं सांगितलं आहे. मात्र, नंतर यूएसजीएसने भूकंप झाला नसल्याचं स्पष्ट केलं. डोंगरावरून इतकी महाप्रचंड दरड कोसळली की त्याची तीव्रता 5.2 इतका भूकंप व्हावा अशीच होती, असं यूएसजीएसने म्हटलं. म्हणजे आधी भूकंप आला नव्हता, तर लँडस्लाईड झाल्याने भूकंपासारखा झटका जाणवला. डोंगराचा एक मोठा भाग बर्फ आणि डोंगरकड्यांसोबत तुटून ल्हेंदे खोला नदीत जाऊन आदळला. ल्हेंदे खोला नदी ही भोटेकोशी नदीची सहायक नदी आहे. ही नदी चीनमधून उगम पावते आणि दऱ्याखोऱ्यातून वाट काढत नेपाळमध्ये येते.

 

ग्लेशियर कोसळला अन्…

सुरुवातीच्या पाहणीत, डोंगरावरून डोंगराचा मोठा भाग आणि बर्फाचा मोठा तुकडा म्हणजे ग्लेशियर ल्हेंदे खोला नदीत कोसळला. त्यामुळे या ढिगाऱ्यामुळे नदीचा रस्ता बंद झाला. सॅटेलाईट फोटोंच्या आधारे संशोधकांनी असं सांगितलं की, या ढिगाऱ्यामुळे नदीचं पाणी 20 किलोमीटरपर्यंत अडवून धरलं होतं. त्यामुळे त्या ठिकाणी एक आर्टिफिशियल तळे तयार झाले.

बांध फुटला आणि….

या ढिगाऱ्यामुळे नदीत तात्पुरता बांध तयार झाला होता. त्यामुळे नदीचं पाणी रोखलं गेलं होतं. हा बांध तुटल्याने जमा झालेलं पाणी अचानक वेगाने खाली वाहू लागलं. या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणावर दगड, बर्फ आणि माती वाहून आली. पाहता पाहता या पाण्याचा प्रवाह इतका वाढला की ल्हेंदे खोला नदीतून निघून हे पाणी भोटेकोशी नदीत येऊन पोहोचलं आणि पाण्याचा आणखी एक मोठा लोट तयार झाला. त्सुनामी आल्यानंतर लाटा उसळाव्या तशा लाटा तयार झाल्या आणि हे पाणी गावागावात शिरलं.

सकाळी 9 वाजता भोटेकोशी नदीमार्गे हे पाणी पुढे सरकलं. त्यामुळे रसुवागढी बॉर्डर एरिया, तिमुरे सहीत अनेक भागात हे पुराचं पाणी शिरलं. त्यानंतर त्रिशुली नदीच्या मार्गाने हे पाणी नुवाकोट आणि दुसऱ्या ठिकाणी गेलं. या पुराच्या पाण्याने काहीच पाहिलं नाही. रस्ते, पूल, इमारती सर्व काही वाहून गेलं.

भौगोलिक स्थितीने वाट लावली

हिमालयाचा हा परिसर प्रचंड निमूळता, उतरंड असलेला आणि दऱ्याखोऱ्यांचा आहे. त्यामुळे अशा वेळी अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस आला तर पाणी आणि मातीचा ढिगारा खालच्या भागाकडे येतो. त्याचा वेग प्रचंड होतो. त्यामुळे पूर वाढण्याला आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीला अधिक वेळ लागत नाही. याच कारणामुळे त्रिशूला नदीचा जलस्तर प्रचंड वेगाने वाढला. मिळालेल्या माहितीनुसार, गलछी परिसरात जलस्तर अवघ्या 30 मिनिटात 9 मीटरने वाढला होता. यावरून या पुराची दाहकता किती असेल याचा अंदाज येतो.

भय अजून संपलं नाही…

या नैसर्गिक संकटानंतर अजूनही भय संपलेलं नाही. नदीच्या वरच्या भागामध्ये अजूनही प्रचंड प्रमाणात ढिगारा असल्याचं सांगितलं जात आहे. जर या ठिकाणी पाणी जमा झालं तर हा ढिगारा फुटू शकतो. त्यामुळे नेपाळमध्ये दुसरा जलप्रलय येऊ शकतो. त्यामुळेच नेपाळ आणि चीनच्या एजन्सी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तर, सॅटेलाईट फोटो, नदीच्या पाण्याचे आकडे आणि भूकंपीय रेकॉर्डच्या मदतीने अजून किती धोका होऊ शकतो, याची माहिती संशोधक गोळा करत आहेत.

Follow Us