काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
नेपाळमध्ये आलेल्या भीषण जलप्रलयात ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर क्षणात वाहून गेले. तिबेटमधील भूकंपामुळे ग्लेशियर फुटून प्रचंड वेगाने आलेलं 'काळं पाणी' सर्वांनाच गिळंकृत करत सुटलं. हा नैसर्गिक प्रकोप पावसाने नव्हे, तर भूकंपामुळे झालेल्या हिमस्खलामुळे घडला, ज्याने नदीचा मार्ग रोखून दाब वाढवला. या प्रलयकारी घटनेचे थरकाप उडवणारे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

नेपाळमध्ये आज बिन बादल निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळाला आहे. तिबेटमधून हवेच्या वेगाने पाणी तांडव नृत्य करत आलं आणि नेपाळमधील होतं नव्हतं सर्व उद्ध्वस्त करून गेलं. इतकं की घरंदारं, जनावरं, माणसं आणि इमारतीच्या इमारती, पूल सर्व काही वाहून गेलं. जीव वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने पळणारी माणसंही पाण्याने आपल्या पोटात सामावून घेतली. सोशल मीडियावर या जलप्रलयाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओतून धडकी भरवणारी दृश्य दिसत आहेत. यापैकी एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तो म्हणजे नेपाळच्या बॉर्डरवरील ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटरचा. हा व्हिडीओ पाहिल्यावर काळजात धडधड झाल्याशिवाय राहत नाही.
नेपाळमध्ये सकाळी 8 वाजून 37 मिनिटाने भूकंप आला. त्यानंतर 8 वाजून 45 मिनिटाचा ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका महालासारखं हे इमिग्रेशन सेंटर आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळीही या इमिग्रेशन सेंटरवर मोठी गर्दी होती. नागरिकांची वर्दळ होती. सेंटरच्या आवारात वाहने पार्क करण्यात आलेले होते. सर्वचजण आपल्या कामात मग्न होते. काही लोक फेरफटका मारत होते. तर काही लोक आपला नंबर येण्याची वाट पाहत होते. पण काळ आपल्या मागावर आहे हे त्यांना माहीत नव्हतं.
Scary visuals from the Gyirong port on the China-Nepal border. The causalities are unfortunately going to be very high. Prayers 🙏🏽 pic.twitter.com/mExf5gU2Lw
— Piyush Rai (@Benarasiyaa) August 26, 2026
अचानक मिठी मारावी तसा…
कुणाला काहीच खबर नसताना अचानक एक काळ्या कुट्ट ढगांप्रमाणे पाण्याचा एक प्रवाह झेपावत आला. उंचच लाटासारखा हा काळाकुट्ट प्रवाह होता. इतका वेगाने हा प्रवाह आला की कुणाला काहीच कळलं नाही. एखाद्या अजस्त्र राक्षसाने मिठी मारावी तशी मिठीच या काळ्याकुट्ट प्रवाहाने ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटरला मारली अन् बघता बघता सेंटरसह सेंटरवरील लोकांना जलसमाधी मिळाली. कुणाला पळण्याचीही संधी मिळाली नाही, इतक्या वेगाने पाण्याचा हा प्रवाह आला होता. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून त्यातून ही दाहकता दिसून येत आहे.
पावसाने हाहा:कार नाही
द काठमांडू पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, नेपाळमध्ये उडालेला हा हाहा:कार पावसामुळे झालेला नाही. नेपाळनमधून आलेल्या एका हिमस्खलाने ल्हेन्डे नदीचा रस्ता रोखला. त्यानंतर नदीत पाणी जमा होत गेलं. नदीत पाण्याचा दाब प्रचंड वाढला. त्यामुळे बर्फ फुटला आणि पाण्याचे लोट प्रचंड वेगाने गावाच्या दिशेने आले.
भूकंप आला आणि…
अमेरिकेच्या यूएसजीएसच्या माहितीनुसार, सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी तिबेटच्या परिसरात 4.4 तीव्रतेचा भूकंप आला. भूकंपाचे स्थान गोसाईकुंडपासून 47 किलोमीटरवर उत्तरेकडे आहे. भूकंपामुळे ग्लेशियर फुटला. पण याची तंतोतंत माहिती घेण्यासाठी काही वेळ जाईल. मात्र, या संपूर्ण परिसरात ग्लेशियरचे तलाव मोठ्या प्रमाणात आहेत, अशी माहिती काठमांडू विद्यापीठाचे प्रोफेसर आणि ज्येष्ठ जलवायू संशोधक रिजान भक्त कायस्थ यांनी सांगितलं.