उरलीसुरली माणुसकी मेली… नेपाळमध्ये मृतदेहांच्या दागिण्यांची लूट; कोण आहेत दोन गिधाडे?

नेपाळमधील भीषण महापुरात सर्वनाश झाला असताना, माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. दोन नराधमांनी मृतदेहांच्या अंगावरील दागिने लुटले. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी चितवनमधून मदन गुरुंग आणि उमेश चौधरी यांना अटक केली.

उरलीसुरली माणुसकी मेली... नेपाळमध्ये मृतदेहांच्या दागिण्यांची लूट; कोण आहेत दोन गिधाडे?
Nepal Tragedy
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2026 | 12:18 PM

नेपाळमध्ये तीन दिवसांपूर्वी विनाशकारी प्रलय आला. या प्रलयात काहीच उरलं नाही. लोकांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. गावंच्या गावं पुराच्या पोटात गडप झाली. माणसेच नाही तर जनावरेही वाहून गेली. तब्बल दीड हजार लोक बेपत्ता आहेत. 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हातात काहीच उरलं नाही. उरलेत फक्त डोळ्यात अश्रू. प्रत्येकजण एकमेकांकडे आशाळभूत नजरेनं पाहत आहे. एकमेकांना सहारा देत आहेत. गाळ बाजूला सारून संसार सावरत आहेत. तरण्यांपासून म्हाताऱ्यांपर्यंत आणि लहान मुलांनीही संसार उभा करण्यासाठी कंबर कसली आहे. काही ठिकाणी तर गावं ओसाड पडली आहेत. गावात माणूस नावालाही दिसत नाही. केवळ मृतदेह पडले आहेत. एकीकडे हे विदारक दृश्य असतानाच दुसरीकडे नेपाळमध्ये माणुसकी मेलेली पाहायला मिळत आहे. काही लोक मृतदेहाच्या अंगावरील दागिने लुटताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील दृश्य पाहून अनेकांच्या मनात कालवाकालव झालीय. या व्हिडीओत पाण्याच्या प्रवाहाबरोबर मृतदेह वाहून येताना दिसतो. मृतदेह आल्यावर दोन तरुण त्या बेवारस मृतदेहाच्या अंगावरील सोनं चोरताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर येताच लोकांमध्ये संताप पसरला आहे. या दोन्ही नराधम गिधाडांना शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

 

पोलिसांनी दोघांना पकडलं

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चितवन जिल्ह्यातील पोलीस तात्काळ अॅक्शन मोडवर आली. पोलिसांनी या दोन्ही नराधमांचा कसून शोध घेतला आणि त्यांना अखेर पकडलं. मदन गुरुंग आणि उमेश चौधरी असं या दोन्ही नराधमांची नावे आहेत. पोलीस आता या दोघांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करत आहे. भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरानंतर नारायणी आणि त्रिशुली नदीच्या बाजूला मृतदेहांची ओळख पटवण्याचं आणि त्याची विल्हेवाट लावण्याचं काम सरकारचे अधिकारी करत आहेत. एकीकडे हे काम सुरू असतानाच या दोन्ही नराधमांनी मात्र, मृतदेहांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत माणुसकी शिल्लक राहिली नसल्याचं दाखवून दिलं आहे.

चितवनमधील परिस्थिती हाताबाहेर

दरम्यान, नेपाळमध्ये अनेक ठिकाणी हाहाकार उडाला आहे. चितवन जिल्ह्यातील परिस्थितीही अत्यंत विदारक आणि भीषण आहे. एकट्या चितवन जिल्ह्यातच 64 मृतदेह आढळून आले आहेत. यावरून या जिल्ह्यात किती हाहाकार उडाला याचा अंदाज येतो. स्थानिक रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाहीये. दरम्यान, नेपाळ पोलिसांनी नागरिकांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. मृतदेहांसोबत कोणी अवामनवीय व्यवहार करत असेल, लुटमार करत असेल तर आम्हाला त्याची त्वरीत माहिती द्या, असं आवाहन नेपाळ पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.

Follow Us