चीनने पुन्हा वाढवले जगाचे टेन्शन, कोरोनानंतर या आजारामुळे रोज 7 हजार मुले रुग्णालयात
H9N2 cases in China | कोरोनानंतर चीनमध्ये नवीन व्हायरस आला आहे. या व्हायरसमुळे रोज सात हजार मुले रुग्णालयात दाखल होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात खबरदारीचा इशारा दिला आहे. या धोकादायक व्हायरसमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी भारत तयार असल्याचेही आरोग्य मंत्रालयातने म्हटले आहे.
बिजिंग, दि. 26 नोव्हेंबर 2023 | चीनमधून आलेल्या कोरोनामुळे दोन वर्षांपेक्षा अधिक काळ जगातील आरोग्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था धोक्यात आली होती. कोरोनाचा व्हायरस चीनमध्ये मिळाल्यानंतर त्याचा प्रसार जगभर झाला होता. त्याच्यातून आता कुठे जग सावरला असताना पुन्हा चीनमध्ये नवीन व्हायरस आला आहे. या व्हायरसमुळे रोज सात हजार मुले रुग्णालयात दाखल होत आहे. चीनमधील उत्तर पूर्व भागात लियाओनिंग प्रातांत मुलांमध्ये रहस्यमय आजार दिसून येत आहे. या आजारामुळे मुलांच्या फुफ्फुसांना सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे तसेच खोकला आणि खूप ताप येणे यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या आजारासंदर्भात चीनकडून माहिती मागवली आहे.
शाळा बंद करण्याची तयारी
निमोनियासारखी अनेक लक्षणे असलेल्या या आजाराचा प्रसार चीनमध्ये वेगाने वाढत आहे. मुलांमध्ये आलेल्या या आजारामुळे सरकारकडून शाळाही बंद करण्याची तयारी केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आजारासंदर्भात धोक्याचा इशारा दिला आहे. कारण लहान मुले आणि वृद्धांना या संसर्गाला अधिक सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या आजारामुळे त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका असतो.
WHO कडून गाइडलाईन
चीनमध्ये पसरलेल्या निमोनियाच्या नव्या व्हायरसमुळे WHO गाइडलाइन जारी केल्या आहेत. या गाइडलाइननुसार, लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. लोकांना स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, काही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच सोशल डिस्टेंसिंगचे पालन आणि मास्कचा वापर करण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
भारतावर काय परिणाम
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चीनमधील प्रकार गंभीरतेने घेतला आहे. भारतात या विषाणूचा प्रसार होण्याचा धोका खूपच कमी आहे. परंतु आरोग्य मंत्रालय या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. चीनमध्ये पसरणाऱ्या या धोकादायक व्हायरसमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी भारत तयार असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. चीनमधून असे आजार का उद्भवतात? यावर आता चर्चा सुरु झाली आहे. प्राण्यांमधून मानवात हे व्हायरस येतात. चीनमध्ये विविध प्रकारचे मास खाल्ले जात असल्यामुळे हे आजार येत असल्याचे म्हटले जात आहे.