अमेरिकेत भारताचा डंका, केरळच्या लेकीने थेट महापौरपद पटकावलं, एलन मस्कचे करोडो डॉलर पाण्यात
अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाच्या नित्या रमन निवडून आल्या आहेत. केरळमध्ये जन्मलेल्या नित्या या पहिल्या भारतीय-अमेरिकन महापौर ठरल्या आहेत, ज्यामुळे भारताचा अमेरिकेतील प्रभाव अधोरेखित होतो. विशेष म्हणजे, या निवडणुकीत एलन मस्क यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च केले होते, परंतु त्यांचे उमेदवार हरल्याने त्यांना मोठा धक्का बसला.

अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या नागरिकांनी इतिहास रचला आहे. केरळमध्ये जन्मलेल्या नित्या रमन यांनी लॉस एंजिलिसचं महापौरपद पटकावलं आहे. नित्या रमन या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्यांनी विद्यमान महापौर करेन बास यांना धोबीपछाड दिला आहे. आकड्यानुसार नित्या यांना 51.1 टक्के मते मिळाली आहेत. तर बास यांना 48.33 मते मिळाली आहेत. या निवडणुकीत बास हे आघाडीवर होते. मंगळवारी रात्री मत मोजणीला सुरुवात झाली. त्यावेळी बास यांचं पारडं जड होतं. पण बुधवारी जेव्हा जसजसे आकडे येऊ लागले तेव्हा नित्या रमन यांनी आघाडी घेतली. 5 नोव्हेंबर रोजी Decision Desk HQ ने नित्या यांच्या विजयाचं प्रोजेक्शन जारी केलं. या निवडणुकीत अब्जाधीश एलन मस्क यांचा डाव पलटला गेला. त्यांचे करोडो रुपये पाण्यात गेले.
नित्या रमन कोण आहेत?
1981 मध्ये नित्या रमन यांचा जन्म केरळमध्ये झाला. वयाच्या सहाव्या वर्षी त्या आईवडिलांसोबत अमेरिकेला गेल्या. 22 व्या वर्षी त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून शहरी नियोजनाची पदवी घेतली. राजकारणात येण्यापूर्वी रमन यांनी शहरातील नागरी सुविधांवरून त्यांनी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम केलं. त्यांनी चेन्नईत ट्रान्स्परंट चेन्नई नावाची संस्था सुरू केली. ही संस्था स्वच्छता, सार्वजनिक व्यवस्था आणि शहरी व्यवस्था चांगली कारण्याचं काम करते. 2013मध्ये लॉस एंजिलिसला गेल्यावर त्यांनी शहरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत काम केलं. बेघर लोकांच्या मदतीसाठी SELAH Neighborhood Homeless Coalition ची स्थापना केली. त्या Time’s Up Entertainment च्या कार्यकारी संचालिकाही होत्या.
2020मध्ये त्यांनी लॉस एंजिलिस सिटी कौन्सिलची निवडणूक जिंकली होती. या विजयानंतर सिटी कौन्सिलमध्ये जाणाऱ्या त्या पहिल्या आशियाई महिला ठरल्या होत्या. 2024 मध्ये त्या पुन्हा विजयी झाल्या होत्या. आता मेयरच्या निवडणुकीत त्या विजीय झाल्या आहेत. लॉस एंजिलिसच्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकन आणि दक्षिण आशियाई वंशाच्या महापौर बनल्या आहेत.
कोणत्या मुद्द्यांवर जोर?
सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर त्यांनी अधिक जोर दिला होता. त्यांनी स्वस्त घरे, भाडेकरूंचे अधिकार, बेघरांची समस्या आणि शहरातील मूलभूत सुविधा यावर अधिक भर दिला होता. लॉस एंजिलिसमध्ये घरे खूप महाग आहेत. असंख्य लोकांना रस्त्यावरच राहावं लागत आहे. हे या शहरासाठीचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे नित्या यांनी हाच मुद्दा अधिक उचलून धरला. त्यांनी रस्ते, स्ट्रिट लाइट आणि स्थानिक सुविधा अत्यंत चांगल्या करण्यावर अधिक भर दिला. या गोष्टी त्यांनी आपल्या अजेंड्याचा भाग बनवल्या.
न्यूयॉर्कमध्ये जोहरान ममदानी यांचा विजय झाला. त्यानंतर लॉस एंजिलिसमध्ये भारतीय वंशाची महिला महापौर झाली आहे. अमेरिकेतील बदलत्या राजकारणाचं हे लक्षण मानलं जात आहे. नित्या या डेमोक्रॅटिक सोशालिस्ट्स ऑफ अमेरिकाशी संबंधित आहेत.
मस्क यांना झटका
या निवडणुकीत एलन मस्क यांनी करोडो रुपये लावले होते. मस्क यांनी रिपब्लिकन उमेदवाराच्या समर्थनासाठी 44.5 ते 47.4 कोटी डॉलर खर्च केले होते. निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी नसलेल्या एखाद्या व्यक्तीने केलेला हा सर्वात मोठा खर्च होता. मस्क यांनी एकट्या टेक्सास सीनेट निवडणुकीत 20 ते 23 कोटी डॉलर लावले होते. पण या निवडणुकीत त्यांचे अनेक समर्थक उमेदवार पडले आहेत. निवडणूक निकालानंतर मस्क यांनी ‘Vote red today’ असं लिहिलेली पोस्ट हटवली आहे.