
Kim Jong Un : उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन कधी काय करेल, हे सांगता येत नाही. किम जोंग याने याआधी घेतलेल्या काही निर्णयांची जगभरात चर्चा झालेली आहे. या हुकूमशाहाला शस्त्रास्त्रांमध्ये फार स्वारस्य आहे. आपल्या देशावर कोणी हल्ला करायला आलाच तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर देता यावे, यासाठी किम जोंग उन नेहमीच वेगवेगळ्या शस्त्रांची निर्मिती करत असतो. दरम्यान, आता किम जोंग उनच्या याच धोरणामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली आहे. कारण सध्या किम जोंग उन अशा काही मिस्लाईल्स तयार करत आहो, ज्याच्या मदतीने थेट अमेरिकेत हल्ले करता येऊ शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर कोरिया क्षेपणास्त्रांच्या बाबतीत आपली ताकद वाढवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. किम जोंग उन याच्या धोरणामुळे आत दक्षिण कोरिया, जपान या दोन देशांसह अमेरिकेलाही धोका निर्माण होणयाची शक्यता आहे. उत्तर कोरियाने काही लांब पल्ल्याच्या मिसाईल्स तयार केल्या आहेत. या मिसाईल्स थेट अमेरिकेच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर हल्ला करू शकतात. उत्तर कोरियाच्या काही मिसाईल्स तर अमेरिकेतील तब्बल 48 स्टेट्सपर्यंत पोहोचून विध्वंस घडवून आणू शकतात. त्यामुळेदेखील अमेरिकेची चिंता वाढली आहे.
उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन याच्याकडून याआधी संयुक्त राष्ट्राने घालून दिलेल्या नियमांचे, बंधनांचे अनेकदा उल्लंघन झालेले आहे. आतादेखील या सर्व बंधनांकडे कानाडोळा करून उत्तर कोरियाकडून लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जात आहे. विशेष म्हणजे उत्तर कोरियाकडून तयार केल्या जात असलेल्या या मिसाईल्स अगदी कमी काळात लक्ष्य भेदतात तसेच लांब पल्ला गाठू शकतात. म्हणूनही दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिका यांची चिंता वाढल आहे. उत्तर कोरिया मात्र आम्ही आत्मसंरक्षणासाठी या शस्त्रांची निर्मिती करत आहोत. दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपान हे तिन्ही देश मिळून आमच्यावर कधीही हल्ला करू शकतात, म्हणूनच आमची ही तयारी चालू आहे, असे उत्तर कोरियाकडून सांगितले जाते आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीनुसार उत्तर कोरियाकडे अमेरिकेपर्यंत पोहोचू शकणाऱ्या फक्त 10 मिसाईल्स आहेत. पण या मिसाईल्सचा हा आकडा 2035 सालापर्यंत 50 पर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे अमेरिका उत्तर कोरियाकडून निर्माण होत असलेल्या आव्हानांना कसे तोंड देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.