Operation Absolute Resolve : मादुरोंना पकडताना डेल्टा फोर्सच्या स्पेशल कमांडो Action मध्ये अमेरिकेच किती नुकसान झालं? माहिती आली समोर
Operation Absolute Resolve : अमेरिकेने वेनेझुएलावर लष्करी कारवाई केली. थेट त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना कैद केलं. अमेरिकेने या मिशनला ऑपरेशन एब्सोल्यूट रिजॉल्व असं नाव दिलं होतं. या मोहिमेत अमेरिकेचं काय नुकसान झालं? ते जाणून घ्या.

अमेरिकेने शुक्रवारी रात्री वेनेझुएलावर हल्ला चढवून त्यांचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतलं. अमेरिकेने या मिशनला ऑपरेशन एब्सोल्यूट रिजॉल्व असं नाव दिलं होतं. एकादेशाने दुसऱ्या देशाच्या राजधानीत जाऊन हल्ला करणं, त्यांच्या राष्ट्राध्यक्षांचं अपहरण करणं ही साधीसोपी गोष्ट नाही. पण अमेरिकेने जगाला आपली क्षमता आणि शक्ती दाखवून दिली. या ऑपरेशनमध्ये आमच्याबाजूला कुठलीही जिवीतहानी झाली नाही, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सांगत आहेत. ते बरोबर बोलतायत. जिवीतहानी झाली नाही. पण अमेरिकेचं सुद्धा काही प्रमाणात नुकसान झालं. त्याची माहिती समोर आली आहे. निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी एकाचवेळी अमेरिकेच्या 20 बेसेसवरुन आणि विमानावाहू युद्धनौकेवरुन 150 विमानांनी उड्डाण केलं.
या 150 विमानांमध्ये ड्रोन, फायटर जेट्स, बॉम्बर विमानं होती. अमेरिकेने या ऑपरेशनआधी सायबर हल्ला केला. सायबर हल्ल्याद्वारे अमेरिकेने वेनेझुएलाची राजधानी काराकासमधील वीजपुरवठा खंडीत केला. शनिवारी पहाटे अमेरिकेच्या फायटर जेट्सनी वेनेझुएलाचं रडार आणि एअर डिफेन्स सिस्टिम उद्धवस्त केली. प्रतिहल्ला करण्याआधीच त्यांना आंधळं करुन टाकलं. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात 40 जण ठार झाले. यात लष्करी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता.
सगळ्या ऑपरेशनची डिटेल
एअर डिफेन्स सिस्टिम उद्धवस्त केल्यानंतरही स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री 2.01 च्या सुमारास मादुरो यांच्या कम्पाऊंडच्या दिशेने जाणाऱ्या हेलिकॉप्टरवर गोळीबार झाला. एक हेलिकॉप्टर कोसळलं. अमेरिकेचे जवळपास 6 सैनिक जखमी झाले.
अमेरिकेने या ऑपरेशनमध्ये डेल्टा फोर्सचा वापर केला. लादेनला मारण्यासाठी नेवी सील्स कमांडो होते. डेल्टा फोर्स त्यापेक्षा वरची कमांडो फोर्स आहे. डेल्टा फोर्सच्या कमांडोजनी स्फोटकांनी कम्पाऊंड उडवून दिलं व काही मिनिटात मादुरो यांच्या बेडरुमपर्यंत पोहोचले.
या सर्वाच डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमधील स्क्रीनवर लाइव्ह प्रसारण पाहत होते.
इमारतीत प्रवेश केल्यानंतर पाच मिनिटात डेल्टा फोर्सने मादुरो त्यांच्या ताब्यात असल्याचं सांगितलं. त्यांना लगेच हेलिकॉप्टरमध्ये बसवून अमेरिकन युद्धनौकेवर आणण्यात आलं.
अमेरिकेने हे ऑपरेशन एब्सोल्यूट रिजॉल्व करण्याआधी डेल्टा फोर्सने अनेक महिने सराव केला होता. यात टीमवर्क होतं. सीआयए या अमेरिकन गुप्तचर संस्थेची भूमिका सुद्धा महत्वाची होती. सीआयएने मादुरो यांच्याबद्दलच्या प्रत्येक छोट्यात-छोट्या गोष्टीची माहिती गोळा केली होती. त्यांच्याकडे मादुरो यांच्या प्रत्येक क्षणाची अपडेट असायची.
