
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले होते. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरची पाकिस्तानात एवढी दहशत माजली आहे की, तो प्रत्येक पाऊल जपून उचलत आहे. याचाच परिणाम म्हणून पाकिस्तानने भारतीय सीमेत दहशतवाद्यांना पाठवण्यासाठी तयार केलेले 72 पेक्षा जास्त लॉन्चपॅड आतील भागात हलवले आहेत. पाकिस्तानचा हा निर्णय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, अद्याप पाकिस्तानच्या काही भागांमध्ये अद्याप दहशतवादी लाँचपॅड कार्यरत आहेत. मात्र त्यांनी सिमेवरील लाँचपॅड हलवले आहेत.
सीमा सुरक्षा दलाने (BSF) शनिवारी (29 नोव्हेंबर 2025) सांगितले की, जर सरकार सीमापार मोहीम ऑपरेशन सिंदूर 2.o सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास सुरक्षा दल शत्रूला मोठे नुकसान पोहोचवण्यासाठी तयार आहेत. मात्र, 7-10 मे दरम्यान चार दिवस चाललेल्या लष्करी कारवाईला थांबवण्याबाबत झालेल्या कराराचा बीएसएफ सन्मान करत असल्याचे अधिकारी म्हणाले.
पाकिस्तानच्या अंतर्गत भागात अनेक लॉन्चपॅड कार्यरत
बीएसएफचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) विक्रम कुंवर म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरदरम्यान बीएसएफने सीमेवर अनेक दहशतवादी लॉन्चपॅड नष्ट केले होते, त्यानंतर पाकिस्तान सरकारने असे लॉन्चपॅड अंतर्गत भागात हलवले आहेत. सियालकोट आणि जफरवालमध्ये साधारण 12 लॉन्चपॅड कार्यरत आहेत, जे खरेतर सीमेवर नाहीत. त्याचप्रमाणे सीमेपासून दूर अंतर्गत भागात 60 लॉन्चपॅड सक्रिय आहेत.”
विक्रम कुंवर यांनी बीएसएफच्या जम्मू फ्रंटियरचे महानिरीक्षक (आयजी) शशांक आनंद आणि डीआयजी कुलवंत राय शर्मा यांच्यासोबत 2025 मधील दलाच्या कामगिरीचा प्रकाश टाकण्यासाठी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत हे सांगितले. यावेळी त्यांनी 22 एप्रिलला पहलगाम हत्याकांडानंतर भारताच्या लष्करी प्रतिक्रियेसाठी केलेल्या ऑपरेशन सिंदूरमधील दलाच्या भूमिकेची माहिती दिली. पहलगाम हल्ल्यात 26 लोकांचा बळी गेला होता.
भारतात घुसखोरीच्या वेळी लॉन्चपॅड सक्रिय होतात
अधिकाऱ्याने सांगितले की, या लॉन्चपॅडबरोबरच त्यातील दहशतवाद्यांची संख्याही सतत बदलत असते. डीआयजी कुंवर म्हणाले, “ते तिथे कायमस्वरूपी राहत नाहीत. हे लॉन्चपॅड सामान्यतः तेव्हाच सक्रिय होतात जेव्हा दहशतवाद्यांना भारतात पाठवायचे असते. त्यांना दोन किंवा तीनपेक्षा जास्त गटात ठेवले जात नाही.” सध्या आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात कोणतेही प्रशिक्षण शिबिर नसल्याचे त्यांनी सांगितले.