भारताच्या कारवाईच्या भीतीमुळे पाकिस्तानची झोप उडाली, ISI प्रमुख आसिम मलिक यांना बनवले NSA
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानमध्ये 2022 पासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) पद रिक्त आहे. पाकिस्तानचे यापूर्वी एनएसए मोईद यूसुफ होते. त्यांच्या निवृत्तीनंतर हे पद गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त आहे. आता आसिम यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर कारवाई करणार आहे. त्याचे पडसाद पाकिस्तानमध्ये चांगलेच उमटत आहे. पाकिस्तान सरकारने भारताच्या कारवाईची प्रचंड धास्ती घेतली आहे. भारताने पाकिस्तानी नेत्यांची झोप उडवली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरुनही पाकिस्तानला फटकारले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आयएसआय चीफ आसिम मलिक यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनवण्यात आले आहे. आसिम यांना हा अतिरिक्त प्रभारी पदभार मिळाला आहे.
आसिम मलिक यांना मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आयएसआय प्रमुख नियुक्त करण्यात आले होते. ‘द एक्सप्रेस ट्रीब्यून’ ने दिलेल्या बातमीनुसार आसिम मलिक यांना पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार करण्यात आले आहे. भारतासोबत वाढलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानने मलिक यांना नवीन जबाबदारी दिली आहे. पाकिस्तानचे मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी भारत 24 ते 36 तासांत हल्ला करणार असल्याचे म्हटले होते.
2022 पासून एनएसए पद रिक्त
पाकिस्तानमध्ये 2022 पासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) पद रिक्त आहे. पाकिस्तानचे यापूर्वी एनएसए मोईद यूसुफ होते. त्यांच्या निवृत्तीनंतर हे पद गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त आहे. आता आसिम यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. ते आयएसआय प्रमुखसोबत ही अतिरिक्त जबाबदारीसुद्धा सांभाळणार आहे.
भारताने एनएसए बोर्डात केले बदल
पाकिस्तानच्या पूर्वी भारताने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात मोठे बदल केले. भारताने रॉ चे प्रमुख राहिलेले आलोक जोशी यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे चेअरमन बनवले आहे. या मंडळात सात सदस्य आहेत. त्यातमध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समधील निवृत्त अधिकारी आहेत.
पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतली. त्यामुळे भारत कधीही हल्ला करु शकतो, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तानने अलीकडेच संयुक्त राष्ट्र आणि रशियाशी चर्चा केली.
