पाकिस्तानात मोठा बॉम्बस्फोट, 7 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
पाकिस्तानातील शांतता समितीच्या कार्यालयाबाहेर मोठा बॉम्बस्फोट झाला. यात ७ जणांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत.

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या मोठा दहशतवादी हल्ला झाला. यानतंर आता पाकिस्तानात मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. उत्तर पश्चिम पाकिस्तानातील दक्षिणी वजीरिस्तानमध्ये शांतता समितीच्या कार्यालयाबाहेर मोठा बॉम्बस्फोट झाला. यात ७ जणांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम पाकिस्तानमधील दक्षिण वझिरिस्तानमध्ये सरकार समर्थक शांतता समितीच्या कार्यालयाबाहेर हा बॉम्बस्फोट झाला. हा स्फोट दक्षिण वझिरिस्तान जिल्ह्यातील मुख्य शहर वाना येथे झाला. एकेकाळी हे शहर पाकिस्तानी तालिबानचा बालेकिल्ला मानले जात होते. AP या वृत्तसंस्थेने स्थानिक पोलीस प्रमुख उस्मान वजीर यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बने विशेषतः शांतता समितीच्या कार्यालयाला लक्ष्य केले होते. ही समिती तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चा उघडपणे विरोध करते. तसेच, ही समिती स्थानिक स्तरावरील वाद मिटवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. पोलीस अधिकाऱ्यांनी हा स्फोट अत्यंत शक्तिशाली असल्याचे सांगितले असून. यामुळे घटनास्थळी मोठी जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
दरम्यान काही दिवसांपासून पाकिस्तानातील सुरक्षाव्यवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यामुळे सरकार आणि लष्करासाठी ही चिंतेची बाब बनली आहे. देशातील अनेक भागांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यातच तीन दिवसांपूर्वी २५ एप्रिल रोजी क्वेट्टा शहरात रस्त्याच्या कडेला एका भीषण बॉम्ब हल्ला झाला होता. यात दहा पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण गंभीर जखमी झाले. या प्राणघातक हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) या संघटनेने स्वीकारली होती. बीएलएने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला बॉम्ब निकामी पथकाच्या वाहनाला लक्ष्य करून करण्यात आला होता. या हल्ल्यात रिमोट-कंट्रोल्ड इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी) चा वापर करण्यात आला होता. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
