
पाकिस्तान हा असा देश आहे, जो नेमहीच काहीतरी कुरापत्या करत असतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर पाकिस्तानवर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तान हा देश लपून-छपून अणुचाचण्या करत आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. असे असतानाच आता सिंधी नागरिक समाजाच्या काही संस्थांनी तसेच सिंधुदेश आंदोलनाच्या संयुक्त मंचाने पाकिस्तानच्या सिंध तसेच पर्वतीय क्षेत्रात कथित गुप्त अण्विक कार्यक्रम चालू असल्याचा दावा केला असून याबाबत चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या कथित आण्विक कार्यक्रमाच्या हालचालींची आंतरराष्ट्रीय स्तरावर चाचणी केली जावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सिंधी नागरिक समाजाच्या संघटना आणि सिंधुदेश आंदोलनाच्या संयुक्त मंचाने संयुक्त राष्ट्र महासचिव, अंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा एजन्सी (आईएईए), संयुक्त राष्ट्राचे निशस्त्रीकरण कार्यालय तसेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालय (ओएचसीएचआर) यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात पाकिस्तानातील जमशोरोच्या उत्तरेस नोरियाबादजवळ, कंबर-शाहदाकोट जिल्ह्याच्या जवळपास, मंचर तलावाच्या पश्चिमेकडील नोरियाबादजवळ अनेक भूमीगत बोगद्यांची तसेच चेंबर्सची निर्मिती करण्यात आली आहे, असा दावा करण्यात आला आहे. हे पत्र जेय सिंध मुत्तहिदा महाज संघटनेचे अध्यक्ष शफी बुरफत यांनी आपल्या अधिकृत एक्स खात्यावर पोस्ट केले आहे.
या पत्रात पाकिस्ताविषयी खळबळजनक खुलासे आणि दावे करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी हे बोगदे आणि चेंबर तयार करण्यात आले आहेत, तिथे सैनिकांचा कडक पहारा आहे. या भागात प्रवेश करण्यास पूर्णपणे प्रतिबंध आहे. या बोगद्यांचा तसेच चेंबरचा उपयोग आण्विक सामान, उपकरणांना ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. या बोगद्यात आण्विक पदार्थ, सामग्री असेल तर यामुळे रेडिओथर्मी प्रदूषण, पर्यावरणाचा विनाश, जागतिक आण्विक सुरक्षा आणि प्रसारबंदीच्या नियमांचे उल्लंघ होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असेही या पत्रात म्हणण्यात आले आहे.
सोबतच या बोगद्यांमध्ये तसेच बंकरमध्ये नेमके काय चालू आहे, याची लवकरात लवकर तपासणी केली जावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. या पत्राचा तणावाची स्थिती निर्माण करण्याचा उद्देश नाही. तर पारदर्शकता वाढावी तसेच तेथील नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी आम्ही हे पत्र लिहित आहोत, अशी भूमिका या पत्रात स्पष्ट करण्यात आलेली आहे. दरम्यान, आता या पत्रानंतर जगभरात एकच खळबळ उडाली असून पाकिस्तान यावर नेमकी काय भूमिका स्पष्ट करणार? तसेच पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या या कथित आण्विक कार्यक्रमाचा भारताला काय धोका असणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.