Special Story : रस्ते बंद… जागोजागी सैन्य आणि पोलीस तैनात, पाकिस्तानात मोठं काही घडणार? 27 सप्टेंबर रोजी…
२७ सप्टेंबर रोजी इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) इस्लामाबादमध्ये देशव्यापी आंदोलन करणार आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. सरकार आंदोलकांना चिरडण्यासाठी पीटीआय नेत्यांची धरपकड करत आहे, रस्ते बंद केले आहेत आणि इस्लामाबादमध्ये सैन्य व पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात केले आहेत.

पाकिस्तान सरकारने सध्या एकाच गोष्टीचा सर्वात मोठा धसका घेतला आहे. तो म्हणजे इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टी अर्थात पीटीआयचा. पीटीआयने येत्या 27 सप्टेंबर रोजी इस्लामाबादेत देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी काढण्यात येणाऱ्या या मार्चमध्ये हजारो लोक सामील होणार आहेत. हा मार्च चिरडून टाकण्यासाठी पीटीआयच्या नेत्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची धरपकड सुरू करण्यात आलेली आहे. तसेच रविवारी मोठी हिंसा उसळण्याची शक्यता असल्याने रुग्णालयांना सावध राहण्याचे आदेश दिले आहेत. इस्लामाबादच्या प्रत्येक रस्त्यावर पोलीस आणि सैन्याला आतापासूनच तैनात करण्यात आलं आहे. प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठं काही घडण्याचे संकेत मिळत आहेत.
M-1 आणि M-14 मोटरवे बंद
M-1 इस्लामाबाद-पेशावर मोटरवेला इस्लामाबाद टोल प्लाजापासून चाच इंटरचेंजपर्यंत दोन्ही दिशेने बंद करण्यात आलं आहे. त्यासोबतच फतेह जंग/तरनोल, संगजानी, ब्रह्मा बहतर, बुर्हान, हजारा मोटरवे, गाजी आणि चाचसहित अनेक इंटरचेंज सुद्धा बंद करण्यात आले आहेत.
तसेच M-14 इस्लामाबाद-डेरा इस्माइल खान मोटरवेला हकला पासून कुंडलपर्यंत दोन्ही दिशेने बंद करण्यात आले आहे. जीटी रोड म्हणजे N-5 ला सुद्धा अटक खुर्द जवळ बंद करण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे मार्ग बंद ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
चार जिल्ह्यात रेंजर्स
पीटीआयच्या मार्चच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने रावळपिंडी, अटक, झेलम आणि मियांवालीमध्ये रेंजर्स तैनात करण्यासाठी केंद्राला विनंती केली आहे. 22 सप्टेंबरपासून 5 ऑक्टोबरपर्यंत रेंजर्स तैनात करण्याची मागणी पंजाब सरकारने केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था ढासळू नये, यासाठी रेंजर्स तैनात करण्यात यावे, असं सरकारचं म्हणणं आहे. एकट्या रावळपिंडीत 10 हजारापेक्षा अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. प्रवेश मार्ग, बॅरियर प्वॉइंट्स आणि महत्त्वाच्या मार्गांवर पोलीस तैनात करण्याबरोबरच कंटेनरही तैनात करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पीटीआय नेत्यांवर कारवाई
या सर्व पार्श्वभूमीवर पीटीआयच्या खैबर पख्तूनख्वाच्या नेत्यांनी पोलीस घरी येऊन कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे. प्रांतिय मंत्री सैयद फखर जहां आणि रियाज खान यांच्या घरावर छापा मारण्यात आल्याचा दावा पार्टीने केला आहे. नॅशनल असेंबली सदस्य मोहम्मद जुबैर खान वजीर यांच्या घराला काही तास घेराव घालण्यात आला, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना नजरकैदेत ठेवलं असून त्यांच्या घराच्या परिसरात गोळीबार करण्यात आल्याचा दावाही पीटीआयने केला आहे.
अध्यक्षांवर एफआयआर
पीटीआयचे खैबर पख्तूनख्वाचे अध्यक्ष जुनैद अकबर यांच्या विरोधात नॅशनल सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे NCCIA ने PECA कायद्याच्या अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. अकबर यांनी टिकटॉक आणि यूट्यूबवरून कथितपणे राज्य विरोधी सामग्री पोस्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. इस्लामाबादला टार्गेट करण्याचं त्यांनी वारंवार म्हटल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
इम्रान यांच्या अटकेबाबत चिंता
एमनेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकार संघटनेने इम्रान खान यांची बहीण अलीमा खान, नूरीन नियाजी आणि उजमा खान यांच्यासहीत पीटीआयचे नेते आणि कार्यकर्त्यांना करण्यात आलेल्या अटकेवर चिंता व्यक्त केली आहे. अलीमा कान यांना 20 सप्टेंबर रोजी 30 दिवसाकरिता प्रशासनिक अटकेत ठेवण्यात आलं आहे. तर नूरीन नियाजी आणि उजमा खान यांनाही अटकेत ठेवण्यात आलं आहे. ही कारवाई अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे, असं एमनेस्टीने म्हटलं आहे.
मोबाईल आणि इंटरनेट बंद होणार?
पीटीआयच्या मार्च दरम्यान इस्लामाबाद, रावळपिंडी आणि अटकमधील काही भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्याची तयारी सुरू आहे. स्थानिक रिपोर्टच्या मते, 26 आणि 27 सप्टेंबर रोजी काही भागात मोबाईल सेवा बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे.
तसेच 27 सप्टेंबरच्या मार्चच्या आधीच पाकिस्तानची राजधानी आणि आसपासच्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. मोटरवे बंद, रेंजर्सचा बंदोबस्त, कंटेनर लावणे, नेत्यांवर कारवाई, मोबाईल आणि इंटरनेट बंद करण्याचा प्रस्ताव आदी सर्व गोष्टींच्या माध्यमातून पीटीआयचा मार्च चिरडण्याची सरकारची तयारी सुरू आहे.
