पाकिस्तानच्या ताफ्यात येणार खतरनाक क्षेपणास्त्र, अमेरिकेसह भारताचीही चिंता वाढली

अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार पाकिस्तान आता एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) बनवत आहे, जे अमेरिकेपर्यंत हल्ला करण्यास सक्षम आहे.

पाकिस्तानच्या ताफ्यात येणार खतरनाक क्षेपणास्त्र, अमेरिकेसह भारताचीही चिंता वाढली
| Updated on: Jun 25, 2025 | 8:00 PM

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबले आहे, मात्र इराणच्या अणुकार्यक्रमामुळे अमेरिका चिंतेत आहे. आता पाकिस्ताननेही अमेरिकेची चिंता वाढली आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार पाकिस्तान आता एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) बनवत आहे, जे अमेरिकेपर्यंत हल्ला करण्यास सक्षम आहे. जर पाकिस्तानने असे क्षेपणास्त्र बनवले तर ते अमेरिकेसह भारतासाठी चिंतेचा विषय ठरु शकते. कारण याद्वारे पाकिस्तान भारताच्या कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला करण्यास सक्षम असेल.

समोर आलेल्या माहितीनुसार, भारताने राबवविलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आता चीनच्या मदतीने क्षेपणास्त्रे अपग्रेड करण्याचा प्रयत्न करत आहे. समोर आलेल्या एका अहवालानुसार अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले की, जर पाकिस्तानने असे क्षेपणास्त्र बनवले तर अमेरिकाचा धोका वाढू शकतो.

ICBM बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणजे काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ICBM हे 5,500 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर हल्ला करणारे क्षेपणास्त्र आहे, जे एक किंवा अधिक थर्मोन्यूक्लियर वॉरहेड्स वाहून नेण्यासाठी डिझाइन केले जाते. नवीन आयसीबीएममध्ये अनेक ऑटो-चार्ज केलेले एमआयआरव्ही असतात, ज्यामुळे एकच क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक ठिकाणी अनेक वॉरहेड्स घेऊन जाऊ शकते.

ICBM बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षेपणास्त्रे सध्याच्या काळात अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, युनायटेड किंग्डम, भारत, इस्रायल आणि उत्तर कोरिया या देशांकडे आहेत. मात्र पाकिस्तान हा अणुबॉम्ब असून ICBM मिसाईल नसलेला एकमेव देश आहे. मात्र आता पाकिस्तान ही शिक्का पुसण्याच्या तयारीत आहे.

पाकिस्तानकडेही आहेत लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे

पाकिस्तानचा भारताला टक्कर देण्यासाठी क्षेपणास्त्रे बनवत असल्याचे पाकिस्नानने कबूल केलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तान कमी आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. जेणेकरुन ते भारतावर हल्ला करु शकतात. पाकिस्तानने याआधी 2025 मध्ये शाहीन-3 ची चाचणी केली होती, जे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याची रेंज 2700 किलोमीटर आहे. हे मिसाईल भारतातील अनेक सहरांवर हल्ला करु शकते.