
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे रावलपिंडीच्या अडियाल तुरुंगात आहेत. गेल्या काही दिवसांपासून शाहबाज सरकाराने त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली नव्हती. मधल्या काळात त्यांची हत्या झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता ते जिवंत असल्याचे समोर आले आहे. आज त्यांच्या बहिणीने तुरुंगात जात त्यांची भेट घेतली. या भेटीत इमरान खान यांनी असीम मुनीर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आगामी काळात माझी हत्या होणार असं त्यांनी म्हटलं आहे. इमरान खान यांच्या बहिणीने काय माहिती दिली याबाबत माहिती जाणून घेऊयात.
इमरान खान यांची बहीण उज्मा खातून यांनी त्यांची भेट घेतली. सुमारे 20 मिनिटांच्या भेटीनंतर उज्मा यांनी सांगितले की, इमरान खान यांची प्रकृती ठीक आहे, मात्र ते एकांतात आहे, त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. तसेच उज्मा यांनी इमरान यांनी त्यांच्याकडे दिलेल्या खळबळजनक माहितीवरही भाष्य केले आहे. उज्मा आणि इमरान खान यांच्यातील भेटीनंतर पीटीआयने एक निवेदन जारी करत दोघांमधील संवादाची माहिती दिली आहे. यानुसार इमारान खान यांनी खालील विधाने केली आहेत.
इमरान खान यांनी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर आरोप करत म्हटले की, मुनीर यांचे सरकार मला बेकायदेशीरपणे ताब्यात घेत आहे आणि आता ते माझी हत्या करू शकतात. माझ्या विरुद्धचे सर्व खटले रद्द होणार आहेत, त्यामुळे मला लष्करी न्यायालयात नेण्याची तयारी सुरू आहे. तुरुंगातील सर्व व्यवस्था आयएसआयच्या नियंत्रणाखाली आहेत आणि आगामी काळात मला काही झाले तर यासाठी मुनीर, डीजी आणि आयएसआय जबाबदार असतील.
पुढे बोलताना इमरान खान यांनी म्हटले की, ‘मला एकांतात ठेवण्यात येत आहे, माझी कोठडी भट्टीसारखी तापते. मला माझ्या मुलांशी बोलण्याची परवानगी नाही, मला मृत्युदंड ठोठावलेल्या कैद्यांसारख्या सुविधा मिळतात. मला पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते, 5 दिवस त्यांची वीज खंडित करण्यात आली होती, मला कुणाला भेटूही दिलं नाही. मात्र मी हुकूमशाही स्वीकारणार नाहीत आणि विजय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवेल. या देशात कायदा नाही तर ‘असिम कायदा’ चालू आहे. जर मला तुरुंगात त्यांना काही झाले तर या असीम मुनीर जबाबदार असतील.’